मुक्तपीठ टीम
२० ऑगस्ट २०१३ रोजी महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड विरेंद्रसिंह तावडेचा ते हिंदूविरोधी मानत असलेल्या आणि सनातन संस्थेच्या श्रद्धा आणि रूढींना विरोध करणाऱ्या लोकांना संपवण्याचा डाव होता. सनातन आणि हिंदू जनजागृतीचा त्यासाठी बँक लुटून पैसे मिळवून शस्त्र निर्मिती कारखाना उभारण्याचाही कट होता. तसंच उत्तरप्रदेश-आसामातून गावठी शस्त्र मिळवून १५ हजारांचे खासगी सैन्य उभारण्याचाही कट होता, असे स्फोटक दावे सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयाला शपथपत्राद्वारे केले आहेत. आरोपी विरेंद्र तावडे याच्या जामीनाला विरोध करत सीबीआयनं आपलं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केलं आहे.
बँक लुटून पैसा! १५ हजारांचं सैन्य! शस्त्रांचा कारखाना!
- सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं, “गोवा बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी सारंग अकोलकरने विरेंद्रसिंह तावडेला इमेल करून सनातन संस्थेच्या कामासाठी उत्तर प्रदेश आणि आसाममधून गावठी हत्यारं मिळवून १५००० लोकांची आर्मी उभी करण्यास सांगितलं होतं.
- आपलं ध्येय गाठता यावे म्हणून शस्त्रास्त्र कारखाना काढण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीने अगदी बँक लुटण्याच्या पर्यायाचंही समर्थन केलं.”
सीबीआयचा आरोपींच्या जामिनाला विरोध
- “विरेंद्रसिंह तावडेसह सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना सनातन संस्थेच्या ‘क्षात्र धर्म साधना’तील शिकवणीचं पालन आणि अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आलं होतं.
- यानुसार वैचारिक विरोधकांना राक्षस, हिंदू विरोधी, धर्मद्रोही, दुर्जन असल्याचं सांगत त्यांना संपवण्यास सांगितलं जात होतं.
- यावेळी सीबीआयने आरोपींच्या जामिनाला विरोध करत ते समाजाला मोठा धोका असल्याचं मत व्यक्त केलं.
- या गुन्ह्यातून आरोपींनी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती संस्थेला न आवडणाऱ्या गोष्टींवर क्रूरपणे उत्तर दिलं जाईल असा संदेश देण्यात आला.
- हे नागरिकांच्या आणि राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्यास पुरेसं कारण आहे.
- यामुळे समाजात दहशत निर्माण होते.
चारही पुरोगामी नेत्यांच्या हत्यांशी संबंध!
तसेच या प्रकरणातील आरोपींचा कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचा आरोप सीबीआयने केलाय.