मुक्तपीठ टीम
जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आता राष्ट्रीय पातळीवरही जोर धरत आहे. महाराष्ट्रानंतर आता राष्ट्रीय स्तरावर राजकीय नेत्यांनी जातनिहाय जनगणनेसाठी मागणी सुरु केली आहे. भाजपाचा मित्र पक्ष असणाऱ्या जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही मागणी उचलून धरली आहे. आज त्यांच्या नेतृत्वाखाली ११ सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. पंतप्रधानांनी त्यांना जातनिहाय जनगणनेबद्दल योग्य निर्णय घेण्याचेही आश्वासन दिले आहे.
बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेच्या मागणीबाबत राजकारण तापू लागले आहे. सोमवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार,विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह ११ नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. हे शिष्टमंडळ सर्वपक्षीय आहे. या बैठकीत पंतप्रधानांना भेटून त्यांनी जातनिहाय जनगणनेबाबत आपली बाजू मांडली. ही बैठक साउथ ब्लॉकच्या पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली.
मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात १० पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, जेडीयूचे विजयकुमार चौधरी, भाजपाचे जनक राम, काँग्रेसचे अजित शर्मा, सीपीआय एमएलचे मेहबूब आलम, एआयएमआयएम अख्तरुल इमान, हमचे जीतन राम मांझी, व्हीआयपीचे मुकेश साहनी, सीपीआयचे सूर्यकांत पासवान आणि सीपीआय (एम) चे अजय कुमार इत्यादी उपस्थित होते.
आगामी निवडणुकीचा विचार करता जातनिहाय जनगणनेची ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी नितीशकुमार यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, जर ही चर्चा यशस्वी झाली तर ते खूप चांगले आहे, अन्यथा ते बिहारमध्ये ही पद्धत आयोजित करण्याचा विचार करतील. नितीश कुमार यांनी सांगितले की, ‘हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आम्ही बऱ्याच काळापासून याची मागणी करत आहोत. जर ते केले तर यापेक्षा काहीही चांगले होऊ शकत नाही. शिवाय, ते फक्त बिहारपुरतेच मर्यादित नसून देशभरातील लोकांना त्याचा फायदा होईल. ते एकदा तरी केले पाहिजे.