मुक्तपीठ टीम
ईडी लावाल तर सीडी लावेन, अशी धमकी देणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीनं अटक केली आहे. भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना हा पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी मोठा धक्का मानला जात आहे. जमीन घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी चौकशी केल्यानंर खडसे यांचे जावई गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली. ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. खडसेंच्या जावयाविरोधात झालेली कारवाई ज्या प्रकरणात झाली आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न.
भोसरीचा भूखंड घोटाळा आहे तरी काय?
• देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसे महसूल मंत्री होते.
• त्यांनी पुण्यातील भोसरी येथे तीन एकर एमआयडीसी भूखंड खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६मध्ये झाला होता.
• ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची तीन कोटी ७० रुपयांना विक्री झाल्याचा आरोप झाला.
• रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
• हा भूखंड मूळात अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता.
• त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१मध्ये तो अधिग्रहित केला होता.
• उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित होता.
• एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री म्हणून १२ एप्रिल, २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिले, असा आरोप आहे.
• पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातेवाईकांना म्हणजेच पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना भूखंड विकला होता.
भूखंड घोटाळा भोवला…मंत्रीपद गेले, आता जावई गजाआड!
• खडसे यांनी २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील जमिन करारासंदर्भातील आरोपानंतर राजीनामा दिला होता.
• कुटुंबियांना शासकीय जमीन स्वस्तात खरेदी करता यावी यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
• एकनाथ खडसे यांनी हे आरोप वारंवार फेटाळले आहेत.
• त्यानंतर, सन २०२० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपशी संबंध तोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला.
• या वर्षाच्या सुरुवातीस, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २०१६ च्या जमीन करारासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सहा तास चौकशी केली. जानेवारी महिन्यातच, त्याच्या मुलीलाही ईडीने समन्स बजावले आणि त्यांची चौकशी केली.
• आज अखेर एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली.
ईडी आली पण सीडी काही दिसलीच नाही!
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना ईडीमार्फत त्रास दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. पण ईडीनं त्यांची चौकशी केली. त्यांच्या जावयाला अटक केली, मात्र खडसे म्हणाले ती सीडी काही दिसलीच नाही!
भोसरी जमीन खरेदीशी संबंध नसल्याचा खडसेंचा खुलासा
• एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही.
• एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही.
• उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे.
• मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध?
• माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत का?
• समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला, असे होते का?
• त्यांच्या त्या स्वतंत्र आहेत. तशी माझी बायको स्वतंत्र आहे.
• माझा जावई एनआरआय आहे, त्यालाही अधिकार आहेत.