मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता त्यांचे मित्र सुजीत पाटकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सुजित पाटकर यांच्यावर लाईफलाईन रुग्णालयात ३८ कोटींचा फुसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर सुजित पाटकर यांच्यासह आणखी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी तपास अद्याप सुरु असल्याच्या ईडीच्या दाव्यामुळे संजय राऊतांची ईडी कोठडी ५ संप्टेबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
तक्रारीत नेमकं काय म्हटलं?
- जून २०२० ते मार्च २०२२ दरम्यान लाईफलाईन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म व फर्मचे भागीदार हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू साळुंखे यांनी २६ जून २०२० रोजी बनावट व खोटे भागिदारी तयार केली.
- ही भागिदारी खोटे व बनावट असल्याचे माहिती असतानाही त्यांनी ही कागदपत्रं सादर केली आहेत.
- फर्मकडे वैद्यकीय मनुष्यबळ पुरवण्याचा अनुभव व ज्ञान नसतानाही त्यांच्याकडे अनुभव असल्याचे खोटे भासवून वरळी व दहिसर जम्बो कोरोना सेंटरचे कंत्राट प्राप्त केले होते.
- तसेच त्यांच्या फर्मला ९ सप्टेंबर२०२० रोजीच्या आदेशान्वये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी त्यांना कंत्राट न देण्याबाबत लेखी कळविलेले होते.
- मात्र त्यांनी ही बाब जाणीवपूर्वक मुंबई मनपापासून लपवून मुंबईतील जम्बो कोरोना सेंटरचा वैद्यकीय सेवा पुरवण्याचे कंत्राट प्राप्त केले.
- तसेच उपचारादरम्यान मृत झालेल्या रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूतही हेच झाले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
- तसेच मुंबई मनपाला दिलेल्या रक्कमेमध्ये घोटाळा केला असून कंत्राटाच्या माध्यमातून अंदाजे ३८ कोटी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार त्यांच्यावर केली आहे.
ईडीच्या दाव्यामुळे राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला
- पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी मुंबईतील पीएमएलए न्यायालयाने सोमवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ५ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित आर्थिक अनियमिततेच्या संदर्भात राऊतांवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याच प्रकरणात त्याच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
- पीएमएलएशी संबंधित खटल्यांची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी पुन्हा संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.
- खरं तर, ईडीने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.
- त्यामुळे अटकेची मुदत वाढविण्यात यावी.
- मात्र, संजय राऊत यांचे वकील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय यांनी सर्व आरोप फेटाळून लावत जामीन मागितला होता.