औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा गाजत आहे. त्यात आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या विमानतळाचं नाव ‘छत्रपती संभाजी महाराज’ करण्याबाबत अधिसूचना लवकरात लवकर काढावी, अशी विनंती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना सविस्तर पत्र लिहून केली आहे.
या पत्रात मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे की, औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 6, 2021
तसेच, नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी, असे देखील पत्रात म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चिला जात आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने नामांतरास ठाम विरोध केल्यानंतर नामांतराचा मुद्दा अधिकच पेटला होता. मात्र, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.