मुक्तपीठ टीम
पुण्यातील हडपसर परिसरातील फातिमानगर चौकात गाडी सावकाश चालवण्याची विनंती करणाऱ्या तरुणीला बीएमडब्ल्यू कार चालकाने दांडक्यानं मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २३ वर्षीय वैष्णवी ठुबे असं पीडित तरुणीचं नाव असून ती राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आहे. कारचालकानं केलेल्या मारहाणीत वैष्णवीचा हात फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कारचालक सुमित टिळेकर आणि एका महिलेवर गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी मनसेकडून कारवाईची मागणी केली जात असून. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करा, नाहीतर मनसे त्याला फोडेल अशी प्रतिक्रिया मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार वैष्णवी ठुबे तिच्या वहिनीसोबत दुचाकीवरुन जात होती.
- त्यावेळी बीएमडब्ल्यू कार चालक सुमित वाहतुकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करत बेदरकारपणे गाडी चालवत होता.
- त्यामुळे दुचाकीवर बसलेल्या वैष्णवीच्या वहिनीच्या पायाला धक्का लागला.
- त्यावेळी वैष्णवीनं सुमितला गाडी सावकाश चालवण्याचा सल्ला दिला.
- आपल्याला कार हळू चालवण्यास सांगितल्याचा राग अनावर होऊन सुमित टिळेकरने तिला शिवीगाळ केली.
- त्यानंतर फातिमानगर चौकात कार थांबवून लाकडी दांडक्याने तिच्या पाठीवर, खांद्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे.
- यामध्ये वैष्णवी ठुबेच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
- या प्रकरणी वानवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
काय म्हणाल्या रुपाली पाटील?
- “ती मुलगी खेळाडू असल्याने तिने तो मार सहनही केला.
- पण आर्मी भरती असो किंवा तिचे पुढील सामने, हात तुटल्यामुळे तिचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
- तुम्ही उर्मट आणि घाणेरड्या वृत्तीच्या माणसांना तातडीने अटक करावी अन्यथा मनसे त्यांना फोडेल” असा इशारा मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी दिला आहे.
वैष्णवी ठुबेची प्रतिक्रिया
- “मी हातही उचलला नव्हता, ते बाहेर येतानाच डायरेक्ट दांडका घेऊन तिला मारहाण करायला लागले.
- तो फटका तिच्या डोक्यावर बसला असता, पण तिने बचाव करुन घेतला.
- हात मध्ये घातल्याने हाताला दुखापत झाली आहे.
- ती राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आहे या घटनेमुळे तिच्या कारकिर्दीला ब्रेक लागला आहे.
- वैष्णवी ठुबेने आक्रमक भूमिका घेत आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचे ३०७ कलम लावावं, अशी मागणी केली आहे.