मुक्तपीठ टीम
नवरा शिपाई आणि त्याची पत्नी मुंबई मनपाची कंत्राटदार हा धक्कादायक प्रकार मुंबई मनपामधून समोर आला आहे. मुंबई मनपामध्ये शिपायाचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी पत्नीच्या नावावर कंपनी स्थापन करून मनपाच्या कोरोना सेंटरमध्ये कोट्यवधीची कामं मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मनपात नोकरी करणाऱ्या या भलत्या ‘उद्योग’पती शिपायांचं एवढं चालत असेल तर बाकीच्यांचे किती उद्योग चालत असतील, अशी चर्चा आता मनपाच्या वर्तुळात रंगू लागली आहे. भाजपाचे मुंबईतील नेते भालचंद्र शिरसाट यांनी या प्रकरणी केवळ दोघांविरोधात कारवाई नको, तर त्यांच्यावर ज्यांचा वरदहस्त असावा असे सत्ताधारी नेते आणि त्यांना वापरून घेणारे प्रशासकीय अधिकारी यांचाही शोध घेऊन कारवाईची मागणी केली आहे.
मुंबई मनपाच्या घनकचरा विभागात अर्जुन नराळे तर देखभाल विभागातील रत्नेश भोसले हे चतुर्थश्रेणी शिपाई आहेत. त्यांचे पगार काही हजार रुपये असले तरी त्यांच्या बायकांनी मात्र कोरोना काळात महापालिकेची कोट्यवधी रुपयांची कामं मिळवली आहेत. हे उघडकीस आल्यानंतर आता या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
पत्नी माझी उद्योगी!
- अर्जुन नराळेची पत्नी अपर्णाच्या नावे असलेल्या श्री एंटरप्रायजेस आणि कंपनीने गेल्या दीड वर्षात एक कोटी ११ लाख रुपयांची कामे मिळवली आहेत.
- तर रत्नेश भोसलेची पत्नी रियाच्या नावे ‘आर. आर. एंटरप्रायजेस’ नावाची कंपनी असून त्यांनी ६५ लाख रुपयांची कामं मिळालीत.
- मनपाच्या नाना चौकातल्या डी विभाग कार्यालयात विविध वस्तू पुरवठा करण्याचं काम या दोन कंपन्यांनी केलं आहे.
- पालिकेच्या डी विभागात कोरोना काळात कुठलीही वस्तू लागली तरी त्याचा पुरवठा करण्याचे काम या दोन कंपन्यांनी केलं.
कोरोना काळातील उद्योग!
- स्क्रू ड्रायव्हरपासून कॉम्प्युटर पार्टपर्यंत आणि टेबलापासून भाड्याने गाड्या देण्यापर्यंतची काम या कंपनीमार्फत होत होती.
- यात कोरोना सेंटरमधील रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिमीटर, इलेक्ट्रिक केटल, स्टीमर या वस्तूंचाही समावेश आहे.
- माहितीच्या अधिकारातून हा सर्व घोटाळा समोर आला आहे.
पत्नींच्या उद्योगात गैर काय?
- मनपा कर्मचाऱ्यांच्या पत्नी किंवा कुटुंबीय काय करतात, त्यावर मनपाचे निर्बंध नसतात.
- पण मुंबई मनपाच्या अधिनियमानुसार मनपात नोकरीला असलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकांना मनपाची अशी कंत्राटे घेता येत नाहीत.
- परंतु या दोघांनी मात्र नियम धाब्यावर बसवत स्वत:च्या पत्नींच्या नावे कंपनी उघडून कोट्यवधींची कामे मिळवली आहेत.
शिपायांची एवढी हिंमत नसणार, वरदहस्त कुणाचा?
- भाजपाचे नेते भालचंद्र शिरसाट यांनी या प्रकरणाविषयी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.
- महानगरपालिकेच्या सेवेतील दोन चतुर्थश्रेणी कर्मचारी एवढी हिंमत दाखवतील असं वाटत नाही.
- हे दोघेही कुणाचे तरी हस्तक असावेत. त्यांना वापरून घेतलं असणार.
- या दोघांना वापरणारे एक तर प्रशासनातील अधिकारी असतील किंवा सत्ताधारी बडी धेंड असतील.
- या प्रकरणी केवळ दोघांविरोधात कारवाई करु नये, तर सत्ताधारी शिवसेना, प्रशासकीय अधिकारी यांच्यपैकी कुणी सामील आहे का, त्याचा शोध घेण्यात यावा.