तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारण हे भोंगेकारण झाले होते. यापुढेही आणखी काही दिवस ते तसे भोंगेबाजीने गाजत राहिल. गाजवण्याचे प्रयत्न तर नक्कीच होत राहतील. मात्र, धार्मिक तेढ वाढवण्याचे आरोप होऊ लागले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांमधून दिली जाणारी दिवसातून पाच वेळेची अजान हा सामाजिक प्रश्न असल्याची मांडणी केली. पण मशिदीवरीलच नाही तर मंदिरांवरील भोंग्यांविरोधात ते औरंगाबादेत बोलले. त्यानंतर काही मंदिरांवरील काकड आरती, शेज आरतीला त्या देवस्थानांचे श्रद्धाळू मुकू लागल्याच्या बातम्याही सुरु झाल्या. आनंद दवेंसारख्या ब्राह्मण महासंघाच्या नेत्यांनीही राज ठाकरेंच्या भोंगेबाजीमुळे हिंदूंचे जास्त नुकसान होईल, असा पुकारा सुरु केला. कुठेतरी भोंगाकारण म्हणावं तसं चालताना किंवा अपेक्षित प्रतिसाद त्या गतीनं मिळवताना कमी पडताना दिसत आहे. त्याला एक कारण महाराष्ट्राचा एकंदरीत स्वभावही असाला. इथं पराक्रम भावतो, आक्रमकताही, पण आक्रस्ताळेपणा नाही. अर्थात तरीही इथं भडका उडूच शकत नाही असं नाही. १९९२-९३च्या दंगली, बॉम्बस्फोटांनंतर महाराष्ट्रात तशी वातावरण निर्मिती झाली. ती केवळ हिंदुत्वामुळे नाही तर काँग्रेसला त्यावेळी लोक वैतागल्यानेही झाली. तरीही हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षांना एकहाती सत्तेचं बहुमत मिळालं नव्हतं. हे विसरता येत नाही. आताही मनसेला जसं अपेक्षित होता तसा भोंगाबाजीला प्रतिसाद दिसला नाही. त्यातूनच आता भाजपाने पुन्हा एकदा आघाडी त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घोटाळे अस्त्र उगारण्यास नव्या दमानं सुरुवात केल्याचं दिसत आहे. हे योग्यही आहे.
खरं तर भोंगेकारणाला प्रतिसाद मिळणारच नाही, असे नाही. ते विश्लेषण नाही तर मनातील इच्छा असेल. तसा प्रतिसाद मिळू नये, असं एक मराठी हिंदू, एक भारतीय म्हणून कितीही वाटले, तरी भारतातच नाही तर जगभरात भावनिक मुद्द्यांना जेवढ्या लवकर उकळी फुटते, तेवढी जगण्या-मरण्याच्या मुद्द्यांना नसतेच. मग अगदी श्रीलंकेसारखे खायचे वांधे झाले तरच लोकं पेटून उठतात. त्यामुळेच अनेकदा राज ठाकरेंसारखे ब्लू प्रिंटपासून अनेक प्रयत्न केल्यानंतर भोंगेबाजीकडे वळताना दिसतात. अर्थात असे शॉर्टकट चालतातच असं नाही. हिंदुत्ववादी राजकारणाचा जो मार्ग राज ठाकरेंनी मनसेसाठी निवडला आहे, तो बजरंग दलछाप आक्रस्ताळी हिंदुत्वाचा आहे. असे शॉर्टकट लक्ष वेधून घेतात. माध्यमांमध्ये गाजवतही ठेवतात. पण यश देतातच असे नाही. तसं असतं तर भाजपाचे ७५ टक्के खासदार बजरंग दलातून आलेले असते. तसं नसतं. अनेकदा लढायला बजरंग दल आणि सत्तेवर दुसरेच असंच होतं. मग त्यात उठता बसता संघाचा उद्धार करत आलेले पासवानांसारखेही असतात. आणि मशिदींवरील भोंग्याचा रक्षणासाठी उभे ठाकण्याची बांग देणारे रामदास आठवलेही असतात!
त्यातही पुन्हा खरंतर ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा ते हवाला देत राज ठाकरे बोलत होते, ते दोन्ही निकाल काही फक्त मशिदींसाठी किंवा अन्य कोणा विशिष्ट घटकांसाठी असूच शकत नाहीत. ते समाजातील सर्वांसाठीच, मग अगदी राजकारण्यांच्या कार्यक्रमांसाठीही लागू आहेत. आज खास त्यासाठी दोन तशा बातम्या दिल्या आहेत. त्यामुळेच आता हिंदू मंदिरांच्या काकड आणि शेज आरतीलाही भोंगेबाजीविरोधातील भूमिकेचा फटका बसू लागला. कुठेतरी भोंगेबाजीचा आवाज विरळ होऊ लागल्याचं सध्यातरी जे दिसतंय त्याचं हेही कारण असावं.
भाजपाने पुन्हा उगारले घोटाळे अस्त्र!
मनसेचे भोंगे काहीसे थंडावू लागताच भाजपाने आता घोटाळे अस्त्र उगारले आहे. सुरुवात केली ती भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी. त्यांनी मुंबईतील वांद्रे भागातील हेरिटेज जागा ठाकरे सरकार घोटाळे करून बिल्डरच्या घशात घालते, असा खळबळजनक आरोप केला. त्यामुळे बिल्डरला एक हजार कोटीचा फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले.
दुसरा गंभीर आरोप केला तो भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी. त्यांनी सचिन वाझे जामीन प्रकरणी एनआयएने न्यायालयात सादर केलेल्या माहितीची आधार घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. सचिन वाझे शिवसैनिक, प्रदीप शर्मा यांनी तर शिवसेनेतर्फे नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली. त्यांच्यावर आता अंबानी स्फोटके प्रकरणातील मनसुख हिरेनच्या हत्येचे आरोप. त्याचे दाखले देत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली. अप्रत्यक्षपणे ते त्या संपूर्ण कटामागे सत्ताधारीच असल्याचा घोटाळा सुचवत आहेत.
भाजपा विरोधक आहे. सत्ताधाऱ्यांवर घोटाळ्यांचे आरोप करणे त्यांचा अधिकारच. भोंगेबाजीपेक्षा घोटाळे चांगले. समाजातील स्वास्थ तरी हरवणार नाही. सत्ताधारी अडचणीत आले तरी वाईट नसतं. जर आरोप चुकीचे असतील तर त्यांच्याकडेही पट्टीचे वक्ते आहेत. प्रत्युत्तर देतील. जर चुकलं असेल तर त्यातून आत्मपरीक्षण करतील ही अपेक्षा. काही चुकीचं घडत असेल, त्यामुळे खूप बिघडत असेल तर ते बदललं जावं. त्यामुळे भोंगे चालत नाहीत म्हणून जरी भाजपाने असे घोटाळे काढले तरी वाईट नाही. त्यात पुन्हा पोलखोल यात्रा तेवढ्या गाजत नसताना आशिष शेलार, केशव उपाध्येंच्या आक्रमक पण मुद्देसुद मांडणीमुळे भाजपाचा फायदाही होऊ शकेल. काहीही झालं तरी चालेल पण महाराष्ट्राला होरपळवणारी भोंगेबाजी मात्र नकोच नको!
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
संपर्क ट्विटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961