मुक्तपीठ टीम
मुळातच उशिरा काढलेल्या नालेसफाईच्या कंत्राटामध्ये पावसाळ्यापर्यंत अवघे ७५ % नालेसफाई करायची असा नियम घालून मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा मुंबईकरांच्या तुंबण्याची व्यवस्था केली आहे असा आरोप मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज सकाळी नालेसफाई पाहणी नंतर बोलताना केला. मुंबईतील केवळ ७५ % नालेसफाई जूनपर्यंत करायची हा एक मोठा घोळ असून त्यावर देखरेखीसाठी भाजपा समित्या स्थापन करणार असल्याचेही ते म्हणाले.
कांदिवली पूर्व येथील पोयसर व अन्य नाल्यांचा पाहणी दौरा केल्यानंतर त्यांच्या हे निदर्शनास आले की केवळ ७५ % नालेसफाई जूनपर्यंत करायची आणि उरलेली नालेसफाई डिसेंबरपर्यंत करायची अशी तरतूद या कंत्राटमध्ये करण्यात आल्यामुळे यावेळी सुद्धा मुंबई पुन्हा एकदा बुडणार असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. मुळातच नालेसफाईची निविदा एक महिना उशिरा काढली, त्याचबरोबर निविदा उशिरा काढत असताना मुंबई शहरातल्या सर्व नाल्यांचे कंत्राट न करता, टप्प्याटप्प्याने कंत्राट काढण्याचा प्रयत्न केला गेला याचाच अर्थ या सगळ्या कंत्राटामध्ये मोठा घोळ असून याचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे ही त्यांनी यावेळेस व्यक्त केले.
महानगरपालिका बरखास्त झाल्यामुळे आणि दरवर्षी नालेसफाईच्या कामात होत असलेल्या घोटाळ्यामुळे मुंबई भारतीय जनता पार्टी प्रत्येक नाल्याची तपासणी करण्याकरिता व नालेसफाई नीट होण्याकरता त्या त्या विभागातील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजातील मान्यवर यांची एक दक्षता पथक स्थापन करणार असल्याची घोषणा सुद्धा अतुल भातखळकर यावेळी यांनी यावेळी बोलताना केली.
नालेसफाई तातडीने करण्याकरिता ज्यांना कंत्राट मिळाले आहे त्यांना अधिक यंत्रसामुग्री देण्यात यावी, तसेच हे काम अत्यंत गतिमान पद्धतीने करावे असे मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना भेटून सांगणार असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले.