सरळस्पष्ट
अंधेरीतील पोटनिवडणुकीतून भाजपाचे मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे. खरंतर अशी माघार घेतली गेली की फायदा समोरच्या प्रमुख उमेदवाराचाच होतो. कारण तो विजयी होणार असतो, असं आपण मानतो. अर्थातच अंधेरीतही तसा फायदा होताना दिसतो तो ठाकरेंच्या शिवसेनेचा. कारण त्यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. वरवर पाहता तसं वाटलं तरी थोडा सखोल विचार केला, तर या माघारीमुळे भाजपानं स्वत:ला वाचवलं, तर शिवसेनेचा जास्तीचा फायदा मात्र हुकवला, असल्याचं दिसतं. त्यामुळे अंधेरीतील एमसीए पॅटर्न हा नेमका किती आणि कोणाचा फायद्याचा ठरला याचा विचार आवश्यक ठरतो.
ज्येष्ठ नेते शरद पवार, राज ठाकरे आणि प्रताप सरनाईक यांना भाजपाला आवाहन केले. त्यानंतर महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर विचार करु असं सांगितलं. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल हे अर्ज मागे घेतील, अशी घोषणा केली. पटेलांनी तसं केलंही. यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त सोपस्कार बाकी आहेत.
अंधेरीत काय घडलं, काय बिघडलं?
अंधेरी मतदार संघातील लढाई ५०-५० टक्के होती. पण बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचं नैतिक कारण सांगत बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचा बालेकिल्ला असणारी ही जागा भाजपाला आंदण दिली. त्यामुळे आधीच ठाकरेंच्या शिवसेनेची शक्यता वाढलीच होती. त्यात त्यांना पक्षचिन्ह गमावावं लागल्यानं आधीची सहानुभुती वाढलीच होती. त्यात ऋतुजा लटके यांची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल राजीनाम्याबद्दल जे काही घडवलं गेलं, त्यानं भाजपाचं बरंच काही बिघडलं. एका दिवसात ऋतुजा रमेश लटकेंबद्दलची सहानुभती प्रचंड वाढली. पतीच्या निधनांनंतर लढणाऱ्या या स्त्रीचा मार्ग रोखला जात आहे, असं पाहून सामान्यांना त्यांच्याविषयीची आपुलकी वाढली. सोशल मीडियावर व्हायरल होणारे अमराठी भाषिक अंधेरीकरांचे व्हिडीओ तेच सांगणारे होते. स्थानिक जाणकारांच्या मते भाजपाच्या विजयाची शक्यता ५० टक्क्यांपेक्षाही खूपच खाली घसरली.
माघार ही भाजपाच्याच हिताची!
मुंबई मनपाच्या महत्वाच्या निवडणुकीआधी असा पराभव भाजपाला मुळीच परवडणारा नव्हताच. माघार ही प्रत्यक्षात भाजपाच्या हिताचीच ठरणारी आहे, असे वाटते. कारण प्रत्येकजण आधीपासून सांगत होते, अंधेरीची पोटनिवडणूक ही लिटमस टेस्ट असल्याचा गाजावाजा केला जात होता. एवढं नक्की होतं, की यातून असली शिवसेना कोणती आणि नकली शिवसेना कोणती यावरही जनमताचा कौल समोर येणार होता.तशी पोटनिवडणूक ही अंधरीतील होती. पण ती मुंबईच्याच नाही तर महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणारी ठरली असती. मुंबईच्याच नाही तर महाराष्ट्र आणि देशाच्या नजरा अंधेरीकडे लागल्या होत्या. त्यात जर पराभव झाला असता, तर भाजपाची फक्त नाचक्कीच नाही, तर दीर्घकालीन राजकीय तोटा झाला असता. त्यामुळे झाकली मुठ सव्वा लाखाची म्हणतो, तसं झालं. भाजपाने माघार घेतली आणि होणाऱ्या राजकीय नुकसानीची हानी कमी केली.
महाराष्ट्राची परंपरा!
अपमानजनक पराभवापेक्षा सन्मानजनक माघार कधीही चांगली असते. त्यात पुन्हा जर त्या पराभवात भविष्यातील पराभवाची बीजं रोवली जाणार असतील, तर त्याचा धोका स्वीकारण्यापेक्षा माघारच चांगली असते. त्यामुळेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माघारीचे निमित्त मिळवून दिले. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार प्रताप सरनाईकांनी री ओढली आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या परंपरेची आठवण करून देताच भाजपाने प्रतिसाद दिला! का कोणास ठाऊक ही परंपरा पंढरपूर, कोल्हापूर आणि नांदेडमध्ये का विसरवली गेली होती! एवढेच नाही तर राज ठाकरेंनाही रमेश लटके चांगले कार्यकर्ते असल्याचा ऋतुजा रमेश लटके यांचा राजीनामा छळ केला गेला, तेव्हा विसर पडला होता. प्रताप सरनाईकांनाही तेव्हा बहुधा आठवलं नसावं. तसंच शरद पवारांचंही. तेही आता जे बोलले ते निवडणूक घोषीत झाली, तेव्हाच बोलले असते, तर चांगलं झालं असतं. पण सर्व राजकीय डावपेच पाहत राहिले. आणि आता लढायची वेळ आली तर तेथे संगनमताचा एमसीए पॅटर्न राबवण्यासाठी पुढे आले. भाजपासाठी ते सोयीचे झाले. भाजपाने तेथे माघार घेतली.
शिवसेनेचा जास्तीचा फायदा कसा हुकला?
शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे भाजपाविरोधासाठी सत्तेची, पक्षाच्या अस्तित्वाची किंमत मोजणारे म्हणून राष्ट्रीय पातळीवर गाजत आहेत. या पार्श्वभूमीवर अंधेरीतील पोटनिवडणुकीकडे पाहिले तर खूप काही लक्षात येतं. असा भाजपा माघारीनंतरच्या सपक विजयापेक्षा भाजपाविरोधात लढून विजय मिळवला असता तर ते शिवसेनेची प्रतिमा अधिक उंचावणारं ठरलं असतं. भाजपाच्या माघारीमुले शिवसेनेला होऊ शकणारा हा जास्तीचा फायदा मात्र हुकला आहे.
एकूणच जसं दिसतं तसं किंवा तेवढंच राजकारण नसतं. त्यापलीकडेही बरंच काही घडत असंत. त्या माघारीमुळे भाजपानं स्वत:ला वाचवलं, तर शिवसेनेचा जास्तीचा फायदा मात्र हुकवला!