मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात काही संघटनात्मक बदल घडवण्यात येण्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. राज्य भाजपाचं नेतृत्व बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांना हटवून आशिष शेलार किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यताही या माध्यमातील बातम्यांमध्ये वर्तवण्यात आली आहे. स्वत: फडणवीस यांनी मात्र त्या बातम्या म्हणजे पतंगबाजी आहे, असं म्हटलंय. बातम्या नसतील तर माझ्याकडे मागा, पण पतंगबाजी करू नका असा सल्लाही त्यांनी माध्यमांना दिला आहे. त्यामुळे भाजपा राज्य नेतृत्वबदलाच्या बातम्या या फडणवीस म्हणतात तशी निव्वळ पतंगबाजी आहे की पाच मनपांच्या निवडणुकांना आक्रमकतेने तोंड देण्याबरोबरच राज्यात भाजपांतर्गत सत्ता संतुलनाची रणनीती राबवण्यासाठी श्रेष्ठी खरंच प्रयत्न करत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मराठी भाजपा नेत्यांच्या दिल्ली वाऱ्यानं चर्चा
- भाजपाच्या राज्यातील नेत्यांच्या दिल्ली वाऱ्यांमुळे या चर्चेला ऊत आला आहे.
- आधी भाजपाचे नेते आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले.
- त्यानंतर राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहा यांची भेट घेतली.
- फडणवीसांनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्लीला गेले.
- महाराष्ट्रातील तीन प्रमुख भाजपा नेत्यांच्या दिल्लीवाऱ्यांमागील नेमकं कारण माहित नसले तरी, त्यामुळे भाजपाच्या गोटात राज्याविषयी काहीतरी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फडणवीसांनी नव्या मंत्र्यांच्या भेटीचं कारण पुढे केलं आहे.
फडणवीस, पाटील आणि शेलार यांच्या दिल्लीवाऱ्यांमध्ये ज्यांचे नाव नाही ते विदर्भातील नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही नावाची काहीजण सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा करतात. पाटील, शेलार आणि बावनकुळे यांच्याविषयी माहिती घेवूया.
चंद्रकांत पाटील
- चंद्रकांत पाटील हे शाहांशी असलेल्या जवळिकीमुळेच २०१४पासून राज्यात प्रभावशाली भूमिकेत राहिल्याचे सांगितले जाते.
- ते फडणवीस यांच्या गटातील नसले तरीही ते मनापासून नसले तरी फडणवीसांची री ओढताना दिसतात, असाही आक्षेप आहे.
- तसेच त्यांचा स्वत:चा असा मजबूत पाया नाही, ते लोकांमध्ये प्रभाव असलेले नेते नाहीत.
- त्यामुळे आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत आणि येणाऱ्या पाच मनपांच्या निवडणुका लक्षात घेत भाजपाला आक्रमकपणे शहरी भागातील शिवसेनेच्या प्रभावाला आव्हान देत मतदारांना भाजपाकडे वळवणारा नेता गरजेचा आहे.
आशिष शेलार
- आशिष शेलार हेही शाहांच्या विश्वासातील आहेत.
- ते आक्रमक भूमिकेसाठीही ओळखले जातात.
- फडणवीसांच्या मंत्रिमंडळात त्यांच्या उशिरा समावेशाचे एक कारण त्यांचा स्वतंत्र बाणाचा मानला जातो.
- मुंबई अध्यक्षपदावर ते असताना २०१७मध्ये शिवसेनेकडून सत्ता भाजपाकडे येता येता राहिली होती.
- त्यामुळे आता २०२२साठी त्यांच्याकडे पद असणं आवश्यक मानलं जात आहे.
- गेले काही दिवस शेलार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सारखे दौरे काढत आहेत. त्यामुळे त्यांची राज्यव्यापी प्रतिमा निर्मितीसाठीच तेस सांगण्यात आले असावे अशी शक्यता आहे.
- ते मराठा समाजातील आहेत, तीही एक जमेची बाजू ठरू शकेल. त्यांनी एका समाजापुरता नेता अशी प्रतिमा राखलेली नसल्यामुळे सर्वसमावेशकतेतूनही ते श्रेष्ठींच्या पसंतीस उतरू शकतात.
चंद्रकांत बावनकुळे
- चंद्रकांत बावनकुळे हे ओबीसी समाजातील नेते आहेत.
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळचे म्हणून ते ओळखले जातात.
- फडणवीस मंत्रिमंडळात ऊर्जाखाते सांभाळताना त्यांनी खूप चांगली कामगिरी बजावली होती.
- पण तरीही २०१९च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
- त्यामुळे तेली आणि अन्य ओबीसींची मते भाजपाला नेहमीप्रमाणे मिळाली नाही, त्यातच समर्थकांची तिकिटे कापल्याने नितीन गडकरीही थंड राहिल्याने विदर्भात भाजपाला फटका बसला होता.
- आता भाजपाने ओबीसी कार्ड खेळायचे ठरवले तर त्यांचा प्रदेशाध्यक्षपदासाठी विचार होऊ शकतो.
- पण पुन्हा गडकरींच्या जवळच्या माणसाला भाजपा श्रेष्ठी प्रदेशाध्यक्षासारखं मोठं पद देतील का? असा प्रश्न आहे.
- कदाचित जाणीवपूर्वक तोडण्यासाठीही तसे केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही काहींचे मत आहे.
- अर्थात पुन्हा प्रमुख नेतृत्व ब्राह्मण समाजाकडे आणि प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी या मांडणीत मराठा समाजाच्या मनात डावलल्याची भावना होण्याविषयीही भाजपा विचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित शेलारांच्या टीममध्ये ते महत्वाच्या भूमिकेत असू शकतील.
फडणवीसांनी मात्र शक्यता फेटाळली, पंतगबाजी नको!
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भाजपात नेतृत्वबदलाची शक्यतेचा इंकार केला आहे.
- त्यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यामागचं कारणही सांगितलं आहे.
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातील नव्या मंत्र्यांच्या कानावर महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही दिल्लीत गेलो होतो, असं त्यांनी सांगितलं आहे.
- त्यामागे दुसरं कोणतंही कारण नव्हतं.
- महाराष्ट्र भाजपात सध्यातरी कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत.
- प्रदेशाध्यक्ष बदलण्याची तर अजिबात चर्चा झालेली नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.
- उगाच काहीही पतंगबाजी करू नका, असे सांगत बातम्या कमी पडल्या तर माझ्याकडे मागा पण चुकीच्या बातम्या देऊ नका, असा सल्ला फडणवीस यांनी पत्रकारांना दिला.
सत्ता संतुलनाची शाहनीती
२०१४च्या निवडणुकीपासून महाराष्ट्र भाजपाता फडणवीसांचा शब्द हा अंतिम मानला जातो. त्यामुळेच मग २०१९च्या निवडणुकीतही त्यांनाच सर्वाधिकार होते. आता झालेल्या मोदी मंत्रिमंडळात विस्तारातही त्यांनी सांगितलेले खासदारच केंद्रात मंत्री झाले, असेही सांगितले जाते. त्यांनी मूळ भाजपातील नेत्यांपेक्षा प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या उपऱ्यांना दिलेले महत्वही खपवून घेतले गेले. मात्र, त्याचवेळी इतर मूळ भाजपान नेत्यांच्या मनात यामुळे सुप्त असंतोषही कायम असतो. चंद्रकांत पाटील हे शाहांच्या जवळचे असले तरी थेट स्वतंत्र भूमिका घेत नाहीत. त्यामुळे शेलारांसारख्यांचा विचार करून पक्षांतर्गत सत्ता संतुलनाची शाहनीती असण्याचीही शक्यता काहींनी सांगितली.
फडणवीस यांनी नेतृत्वबदलाच्या बातम्यांना पतंगबाजी म्हटलं असलं तरी भाजपा श्रेष्ठी त्यातही अमित शाह यांच्या मनात राज्यात भाजपांतर्गत सत्ता संतुलन असावं असा विचार कायम असल्याचं भाजपाच्याच काही नेत्यांचे म्हणणे आहे. त्यातून काही बदल आता लगेच नाही तरी भविष्यात झाले तर आश्चर्य वाटायला नको.