मुक्तपीठ टीम
देशाच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या व्होरा समितीचा अहवालाला भारतीय जनता पार्टी पुन्हा चर्चेत आणत आहे. या अहवालात माफिया टोळ्या, गुन्हेगार, राजकारणी, सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यातील संबंधाबाबत धक्कादायक माहिती असलेला एनएन व्होरा समितीचा अहवाल उपलब्ध आहे. या अहवालात त्याचे ठोस पुरावे सादर केल्याचे सांगितले जाते. भाजपाचे मुंबईतील अंधेरी पश्चिम मतदारसंघातील आमदार अमीत साटम यांनी व्होरा समितीचा संपूर्ण अहवाल जाहीर करावा अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमीत साटम यांच्याकडे केली आहे.
नव्वदच्या दशकात भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात आक्रमक मोहीम राबवली होती. त्यासाठी त्यांनी संघर्ष यात्रा काढली होती. पुढच्या काळात त्यांचे स्वीय्य सहाय्यक असणारे अमीत साटम पुढे थेट राजकारणात आले. ते काही वर्षे मुंबई मनपाचे नगरसेवक होते. गेली सात वर्षे मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातून आमदार आहेत. आता त्यांनीच राजकारण, प्रशासन आणि गुन्हेगारी संबंधांचा शोध घेतलेल्या व्होरा समितीच्या अहवाल जाहीर करण्याची मागणी केली आहे.
‘मुक्तपीठ’शी बोलताना आमदार अमीत साटम म्हणालेत, “आपल्या देशावर, महाराष्ट्रावर आणि खास करून मुंबईवर नार्को टेररिझमचा प्रहार झालेला आहे. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांनंतर अंडरवर्ल्ड माफिया, सरकारी अधिकारी, राजकीय नेते यांच्यामधील घनिष्ठ सबंध लपवण्यासाठी व्होरा समितीचा अहवालामधील फक्त १० पानांचा अर्धवट ड्राफ्ट सादर केला गेला. त्यामुळे मी व्होरा समितीचा पूर्ण अहवाल जाहीर करण्यासाठी आज या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे.”
आमदार अमीत साटम यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे :
• गेल्या काही महिन्यांपासून आपल्या देशावर आणि खास करून मुंबई शहरावर आणि महाराष्ट्रावरती नार्को टेररिझमचा प्रहार हा दिसून येतो.
• मोठ्याप्रमाणावर ड्रग्स आणि त्याचा व्यवसाय हा अंडरवर्ल्ड कंट्रोल करत असतात.
• त्यामुळे १९९३ च्या मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर एन.एम व्होरा साहेबाची जी कमिटी गठीत करण्यात आली होती, त्या व्होरा कमिटीच्या अहवालामध्ये मोठ्याप्रमाणावरती अंडरवर्ल्ड, माफिया,ब्युरोकसी, गव्हरमेंटमधले अधिकारी तसेच राजकीय नेते यांच्यामधले घनिष्ट संबंध, यामधले फायनान्शिअल डिलींग्स, फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शन याच्या सदर्भासह पुराव्यानिशी हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
• आणि मोठ्याप्रमाणावरती स्वत:ला नेते म्हणवून घेणारे लोकं हे कशाप्रकारे अंडरवर्ल्डशी हातमिळवणी करून या अंटीनॅशनल अॅक्टिव्हीटीमध्ये सामील होते याच्यावरती त्यामध्ये पुराव्यानिशी अहवाल आहे.
• परंतु या अहवालातल्या ११० पानांच्या अहवालापैकी फक्त १० पाने १९९५ मध्ये टेबल करण्यात आली होती आणि १०० पानाचा हा अहवाल अजूनपर्यंत देशासमोर आलेला नाही आहे.
• त्यामुळे मी देशाचे गृहमंत्री श्री अमित शाहा यांना विनंती केलेली आहे की, या देशाच्या हितासाठी, या देशाच्या युवकांच्या हितासाठी आणि नॅशनल सिक्योरिटीच्या दृष्टीकोनातनं एन.एम व्होरा कमेटीचा संपूर्ण जो ११० पानाचा जो अहवाल आहे तो या देशासमोर आला पाहिजे.
• आणि या देशाला कळलं पाहिजे की पांढरे कपडे आणि ब्युरोकॅसीच्याआड या अंडरवर्ल्डशी हातमिळवणी करून कोण या देशाच्या विरुद्ध कृत्य करीत होतं. कोण अंटीनॅशनल अॅक्टीव्हिटीजमध्ये सामील होते? हे जाणण्याचा अधिकार हा भारतीय नागरिकांचा आहे.
पाहा व्हिडीओ आमदार साटम काय म्हणाले?
आमदार अमीत साटम यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पाठवलेले पत्र
तारीख:-११ नोव्हेंबर २०२१.
श्री अमित शाह जी,
केंद्रीय गृहमंत्री.
आदरणीय साहेब,
नमस्कार.
गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर ड्रग्स माफियांच्या कारवायांचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे या देशातल्या तरुणांना लक्ष्य करण्यासाठी एक मोठा नार्को दहशतवादाचा कट रचला जात आहे. या संपूर्ण ड्रगच्या कारवायांना अंडरवर्ल्डद्वारे नियंत्रित करून चालवले जाते, तसेच त्यांचाच पैसा असतो. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा मोठा धोका आहे, हे मला निदर्शनास आणून द्यायचे आहे.
माफिया संघटना, गुन्हेगार, राजकारणी, सरकारी अधिकारी, लोकसेवक यांच्यातील संबंधाबाबत धक्कादायक माहिती असलेला एनएन व्होरा समितीचा अहवाल उपलब्ध आहे. या अहवालात त्याचे ठोस पुरावे आहेत.
रॉ, इंटेलिजन्स ब्युरो, तसेच सीबीआयच्या सदस्यांचा समावेश असलेल्या समितीने १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्यावेळी मुंबईत अंडरवर्ल्ड समांतर सरकार चालवत होतं, असं मत एकमताने व्यक्त केले होते
व्होरा कमिटीचा मूळ अहवाल ११० पानांचा असून १९९५मध्ये केवळ ११ पाने जाहीर करण्यात आली होती. सरकारी कार्यालयात बसलेले, निवडणूक लढवणारे, मते घेणारे आणि देशद्रोह्यांशी हातमिळवणी करणारे कोण होते, हे देशाने जाणून घेतले पाहिजे. आजही अंडरवर्ल्डशी हातमिळवणी करणारे ते घटक आजही तसेच करत असू शकतात. अशांचा पर्दाफाश करण्यासाठी आताही तो अहवाल प्रकाशित करणे महत्त्वाचे ठरते.
म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्वतः या प्रकरणाकडे लक्ष द्या आणि व्होरा समितीचा संपूर्ण 110 पानांचा अहवाल जाहीर करा.
तुमचा नम्र
अमीत साटम
आमदार,
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ