मुक्तपीठ टीम
वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना भाजपच्या नेत्याकडून मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडेंवर आरोप करणारी ‘ती’ महिला आपल्यालाही ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप मुंबईच्या पश्चिम उपनगरातील भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी केला आहे.
एकीकडे धनंजय मुंडे प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता माजली आहे. आधी मेहबूब शेख, नंतर धनंजय मुंडे आणि आज नवा मलिकांचे जावई असे एका मागोमाग एक तीन वाद उफाळल्यानं राष्ट्रवादीची तातडीनं बैठक झाली. या बैठकीआधी शरद पवारांनी प्रथमच यावर प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोलीस तपासापर्यंत वाट पाहण्याची भूमिका मांडल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना राजीनाम्यासाठी सांगितले नसल्याचे स्पष्ट केले. नेमके त्याच वेळी भाजप मेते प्कृष्णा हेगडे पश्चिम उपनगरातील आंबोली पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांना पाहिल्यावर माध्यमांना ते मुंडेंविरोधात नवा स्फोट करतील असं वाटलं होतं. पण प्रत्यक्षात हेगडे यांनी वेगळाच गौप्यस्फोट केला.
माजी आमदार, भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी सत्ताधारी पक्षाच्या धनंजय मुंडेंवर हल्ला चढवण्याऐवजी आरोप करणाऱ्या महिलेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
त्यांनी आरोप करणारी महिला
मुंडे यांना ब्लॉकमेल करत असल्याचा आरोप केला. तसेच ती महिला मलाही ब्लॉकमेल करत आहे असा आरोप त्यांनी केला. २०१०पासून ती मलाही ब्लॅकमेल करते असे त्यांनी सांगितले.
मुंडेंवर आरोप करणारी ती महिला हनी ट्रॅप करणारी महिला आहे. त्या महिलेच्या कारवायांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचेही हेगडे यांनी सांगितले.