मुक्तपीठ टीम
मंत्र्यांच्या राजकारणाबाहेरच्या नको त्या भानगडींमुळेच राज्यातील आघाडी सरकार सातत्यानं अडचणीत येताना दिसत आहे. संख्याबळानं मजबूत असलेल्या भाजपला त्यामुळे आरोपांच्या फैरी झाडण्यासाठी तयार दारुगोळा मिळत आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे प्रकरण कसं बसं मिटत असतानाच त्यांच्याच बीडमधील एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी यवतमाळ एका मंत्र्यावर भाजपने आरोप केल्यामुळे आता सरकारसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे.
पुण्यात २३ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणीने हडपसर येथील मोहम्मदवाडी भागात इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमागे महाआघाडी सरकारमधील एका मंत्री असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विरोधी पक्ष नेत्यांच्या फडणवीसांचे आरोप
- हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे.
- पुणे पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे
- यामधील सत्य काय आहे हे जनतेसमोर आणलं पाहिजे.
- एका तरुणीची अशाप्रकारे झालेली आत्महत्या आणि त्याच्या भोवती तयार झालेले संक्षयाचे वर्तुळ आहे ते दाबण्याचा प्रयत्न पोलिसांनी करु नये.
- त्यासंदर्भात सत्य पोलिसांनी बाहेर आणावं.
सदर आत्महत्या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना निवेदन दिले असून यात मृत तरुणीचे महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रकरण काय आहे?
- मुळची परळीच्या असणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने पुण्यात रविवारी मध्यरात्री आत्महत्या केली.
- ही तरुणी शिक्षणासाठीआपल्या भावासोबत पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती.
- रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तिने महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली.
- हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच या तरुणीचा मृत्यू झाला.
- त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि यवतमाळ येथील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.
- प्रेमसंबंधातूनच या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
- पण या तरुणीच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मजकूर सापडल्याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही.
भाजप आमदार अतुल भातखळखरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पुण्याच्या वाजवडी परिसरात राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने ९ फेब्रुवारी २०२१ रोजी मध्यरात्री एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. परंतु हे प्रकरण केवळ आत्महत्येचे नसल्याचे निदर्शनास आले आहे. शिवसेना पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आमदार व आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नेत्याचे नाव या प्रकरणी पुढे आले आहे. या मंत्र्यांचे व आत्महत्या केलेल्या तरुणीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सोशल मीडिया वर सुरू आहेत, यासंदर्भातील ऑडिओ क्लिप्स व काही फोटो व्हायरल होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या नावे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून, या प्रकरणावी तात्काळ विशेष शोध पथकाकडून (एसआयटी) चौकशी करावी ही नस विनंती.
काही दिवसांपूर्वी आपल्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार करण्यात आली होती, तसेच या मंत्र्यांनी आपली दोन नाबालिक मुले डांबून ठेवली असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने केली असल्याचे प्रकरण ताजे असतानाच आपल्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्यांचे नाव थेट एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणाशी जोडले जात आहे. इतक्या गंभीर प्रकरणांमध्ये आपल्याच मंत्री मंडळातील सहकारी मंत्र्याची नावे पुढे येत असताना आपण डोळ्यावर काळी पट्टी बांधून बसला आहात, अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांची नावेच जर अशाप्रकारे महिला अत्याचारांच्या संदर्भातील प्रकरणांमध्ये समोर येत असतील तर महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामुळे आपण कोणत्याही दबावाला बळीज पठता या प्रकरणाची तात्काळ सखोलपौकशी करावी, हीनय विनंती.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा… pic.twitter.com/pKTSrbTmVX
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 11, 2021