मुक्तपीठ टीम
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कट्टरवादी संघटनेवर केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईमुळे देशात धार्मिक विद्वेष आणि दहशतवाद माजविण्याचा कट उघड झाला असून देशाच्या लोकशाही व सामाजिक सलोख्याशी तडजोड नाही हेच या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. विरोधकांनी क्षुद्र राजकारण बाजूला ठेवून देशाच्या सुरक्षेबाबत सर्व राजकीय पक्षांचे ऐक्य असल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहन प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या कारवाईनंतर लांगूलचालनवादी पक्षांनी बाळगलेले मौन चिंताजनक आहे, असे सांगून उपाध्ये यांनी शिवसेनेकडे सूचक अंगुलीनिर्देश केला. मुस्लिम मतांवर डोळा ठेवून त्यांचे लांगूलचालन करण्याची शिवसेना पक्षप्रमुखांची नीती गटनेत्यांच्या मेळाव्यातच स्पष्ट झाली आहे. मात्र, पीएफआयवरील कारवाई ही कोणत्याही धर्माच्या विरोधातील कारवाई नसून दहशतवादास व फुटीरतावादास खतपाणी घालणाऱ्या व्यापक कटाच्या विरोधातील कारवाई आहे. हिंदुत्वाचा मुखवटा पांघरून मुस्लिम मतांवर डोळा ठेवण्याचे दुहेरी राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या कारवाईवर मौन का पाळले, असा सवालही उपाध्ये यांनी केला आहे.
विरोधकांच्या क्षुल्लक राजकारणामुळेच राज्यातील मुस्लिमांची दिशाभूल होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. अराजकाच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तान अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहे. पाकिस्तानच्या समर्थनाची घोषणाबाजी करणाऱ्यांबाबत मौन पाळण्याच्या राजकारणातून मुस्लिम समाजात संभ्रम पसरविला जात आहे, असे ते म्हणाले. संपूर्ण देश आज पीएफआयच्या विघातक कारवायांची उकल करणाऱ्या तपास यंत्रणांच्या पाठीशी असताना, क्षुल्लक राजकारणापोटी या कारवायांवरच प्रश्नचिन्हे उमटविणाऱ्या विरोधकांचा हेतू शंकास्पद आहे, असेही उपाध्ये म्हणाले. मुस्लिमांच्या अनुनयासाठी कारवाईसंबंधात मौन पाळणाऱ्या ठाकरे गटाचे राजकारण देशाच्या सुरक्षिततेस बाधक आहे, अशी टीकाही त्यांनी केली. याआधी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या नवाब मलिक यांना शाबासकी देऊन व त्यांच्या मंत्रिपदास संरक्षण देऊन ठाकरे यांनी आपल्या क्षुद्र राजकारणाचे प्रदर्शन घडविले होते, याकडेही उपाध्ये यांनी लक्ष वेधले.