मुक्तपीठ टीम
धर्म, जात, भोंगा, हनुमान चालिसा अशा भावनात्मक मुद्द्यांवरील आंदोलनांचा गदारोळ माजलेल्या महाराष्ट्रात बऱ्याच दिवसांनी एक आंदोलन जनतेच्या प्रश्नावर होत आहे. राजकारणातील धर्मकारणात आघाडीवर असलेल्या भाजपानेच औरंगाबाद मनपा निवडणुकांपूर्वी पाणी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे, हे विशेष! औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा जलाक्रोश मोर्चा निघाला आहे.
औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न गेल्या दोन वर्षांपासून गंभीर बनला आहे. औरंगाबादकरांना आठ दिवसांआड पाणी मिळत आहे. महापालिका पाणीप्रश्न हाताळण्यास पूर्णपणे अपयशी ठरली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा जलाक्रोश मोर्चा भाजपाच्या वतीने काढण्यात आला आहे.जलआक्रोश मोर्चाला पैठणगेटजवळून टिळकांच्या पुतळय़ापासून सुरुवात होईल. औरंगपुरा भागातून जिल्हा परिषदमार्गे मराठवाडा सांस्कृतिक मंडळापासून मोर्चा महापालिकेत धडकणार आहे.
भाजपाकडून जलआक्रोश मोर्चाची जोरदार तयारी!
- भाजपाकडून जलआक्रोश मोर्चाचीही जोरदार तयारी आहे.
- मोर्चात किमान ५० हजार महिला व पुरुष सहभागी होतील, याचे नियोजन करण्यात आले आहे.
- विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय दिसेल, असे नियोजन केलेले आहे.
- पाणीपट्टीत ५० टक्के सूट देण्याच्या निर्णयाचेही फलक शहरभर लावण्यात आलेले आहेत.
- तर दहा-दहा दिवस पाण्याची वाट, यांची मस्तीची भाषा-वेगळाच थाट, अशा घोषवाक्यांची भाजपाने फलकबाजी केली आहे.