मुक्तपीठ टीम
सध्या सौम्य लक्षणे आहेत, मात्र आपली प्रकृती ढासळली तर आपल्यावर कोण उपचार करणार या भीतीने ग्रासलेले लोक मिळेल त्या रुग्णालयात दाखल होत आहेत आणि सौम्य लक्षणे आहेत म्हणून होम क्वारंटाईन असलेल्या लोकांची प्रकृती ढासळली तर त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यासाठी राज्यभर ठिकठिकाणी कोरोना ओपीडीची नितांत आवश्यकता असून यावर तात्काळ निर्णय व्हावा अशी मागणी भाजपा नेते डॉ. सुनील देशमुख व भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी संयुक्त पणे केली आहे.
आज आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सुनील देशमुख व शिवराय कुळकर्णी बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र खांडेकर, शहर सरचिटणीस गजानन देशमुख, मंगेश खोंडे, दीपक खताळे प्रामुख्याने उपस्थित होते.
सध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह येताच सौम्य लक्षणे असलेले लोकही पुढच्या दोन – चार दिवसात आपली प्रकृती ढासळू नये म्हणून स्वतःला रुग्णालयात दाखल करून घेण्याचा प्रयत्न करतात. परिणामी अतिशय आवश्यक असलेल्या गरजू रुग्णांना बेड उपलब्ध राहत नाहीत. यात त्या रुग्णांची चूक नाही. त्यांची मानसिकता आणि भीती आपण समजून घेतली पाहिजे. कारण एकदा आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आला की बहुतांश डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करत नाहीत. मग अशा स्थितीत तब्येत अधिक खराब झाल्यास कोणाकडे जायचे हा गंभीर पेच रुग्णांसमोर निर्माण होतो. आणखी एक महत्वपूर्ण बाब निदर्शनास आली आहे, आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आला तर आपल्यावर कोणीच उपचार करणार नाही म्हणून देखील अनेक लोक चाचणी करीत नाही. यात काही दिवस घालवल्यावर त्यांची प्रकृती चिंताजनक बनते आणि मग तो रुग्ण धावाधाव करायला लागतो. नंतर रुग्णालयातही त्यावर उपचार करणे कठीण होऊन बसते.
कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी सुरू असलेल्या सर्व उपाययोजनांसह काही लक्षणे दिसताच लोकांनी आरटीपीसीआर ही कोरोना टेस्ट करणे महत्वाचे आहे. रुग्ण पॉझिटिव्ह निघताच त्यास उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध आहे, हा विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. लोक पॉझिटिव्ह होताच त्यास नॉनकोरोना डॉक्टर्स तपासत नाहीत आणि दुसरीकडे त्याला रुग्णालयात जागेअभावी किंवा पैशांअभावी दाखल होता येत नाही.
होम क्वारंटाईन असलेल्या असंख्य रुग्णांच्या मनात भीती निर्माण झाली किंवा थोडा त्रास वाढला तर त्याने कुठे धाव घ्यावी, ही गंभीर समस्या बनलेली आहे. कोरोना रुग्णालयां शिवाय सौम्य लक्षणे असलेल्या, होम क्वारांटाईन असलेल्या रुग्णांसाठी प्रत्येक शहरात विविध भागात कोरोना ओपीडी सुरू झाल्यास रुग्णांच्या मनात असलेली भीती दूर होईल. या लाटेत एकाच घरातील सर्व लोक संक्रमित होत असल्याचे प्रमाण अधिक आहे. घरातील एखादा गंभीर व्यक्ती रुग्णालयात दाखल असतो. त्याची सेवा करता यावी म्हणून संपूर्ण कुटुंब जुंपले असते. अनेकदा या घरातील सर्व लोक चाचणी देखील करीत नाहीत. अशा सर्व लोकांमध्ये आपल्याला कोरोनावर उपचार करणारा डॉक्टर उपलब्ध आहे, हा विश्वास निर्माण होईल. परिणामी चाचणी टाळणारे लोक देखील चाचणी करून घेतील आणि संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल.