मुक्तपीठ टीम
हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर आता अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. दीपाली यांची मेळघाटात २०१४ पासून २०२१ पर्यंत सात वर्षांची सेवा झाली होती. आता त्यांना मेळघाटाबाहेर बदली हवी होती. हरिसाल येथून परतवाडा येथे बदली मिळावी यासाठी दीपाली चव्हाण यांनी सरकारमध्ये कोण्या मंत्र्याला पैसे दिले होते, याचा देखील तपास लागला पाहिजे अशी मागणी, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
मृत दीपालीच्या मेळघाटातील सात वर्षांच्या बदलीनंतर तिला मेळघाटातून बदली हवी होती. यासाठी ‘संबंधितांना’ (बदलीसाठी पैसे घेणारी यंत्रणा) पैसेही दिले होते. मात्र, पैसे देऊनही बदली होत नसल्याने त्या खचल्या होत्या, असा दावा दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी केला आहे.
पैसे दिल्याशिवाय बदली होतच नाही, हे काही आता लपविण्यासारखे नाही. पैसे दिल्यावरही बदली होत नसल्याने आम्ही पैसे परत मागितले होते. मात्र, तेही परत करण्यात आले नसल्याचे राजेश मोहिते यांनी स्पष्ट केले आहे.
मेळघाटातील वन कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी पैसे घेणारे कोणते रॅकेट सक्रिय होते? हे रॅकेट महाविकास आघाडीतील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सक्रिय होते? आमचे पैसे परत करा म्हणून दीपाली चव्हाण आणि तिचे पती कोणाकडे खेटे घालत होते? राजेश मोहिते यांनी पैसे घेतलेल्या पण आपले नाव जाहीर न करण्याचा”त्या” मोठ्या इसमाचा म्हणजे कोणाचा दबाव दीपालीच्या कुटुंबियांवर आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासात मिळाली पाहिजे. दीपालीच्या आत्महत्या प्रकरणात हा देखील महत्वाचा मुद्दा कारणीभूत आहे. आपली पत्नी या भ्रष्ट व्यवस्थेची बळी ठरली, हे राजेश मोहिते यांनी स्पष्ट केले आहे. बदली साठी पैसे घेणाऱ्या त्या नेत्याचे नाव उघड होणे आणि त्यावर देखील कठोर कारवाईची मागणी, शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.