मुक्तपीठ टीम
ड्रग्स प्रकरणावरुन सुरु झालेला एनसीबी-बीजेपीविरुद्ध एनसीपी वाद आता विकोपाला गेला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या आरोपसत्रानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारतीय यांनीही मलिकांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. या प्रकरणी त्यांनी मलिकांविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. क्रूझ पार्टी ड्रग्स प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यापासून, मलिक नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि त्याचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहे. एवढेच नाही तर त्यांनी मोहित भारतीय आणि इतरांवरही अनेक आरोप केले आहेत.
मोहित भारतीय यांनी यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजी नवाब मलिक यांना नोटीस बजावली होती. त्या नोटिसमधून मलिकांना बदनामीकारक विधाने थांबवण्यास सांगितले होते. नवाब मलिक यांनी मात्र मागे हटण्याऐवजी ११ ऑक्टोबर रोजी काही वृत्तवाहिन्यांवर आरोपांची पुनरावृत्ती केली. त्याच दिवशी मोहित भारतीय यांनी मलिक यांना आणखी एक नोटीस पाठवून, ते काय म्हणाले ते सिद्ध करा किंवा असे दावे करणे थांबवण्यास सांगितले. मात्र मलिक यांनी आरोपांची पुनरावृत्ती सुरूच ठेवली.
त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी कंबोज यांनी माझगाव येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली. एवढेच नाही तर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन १०० कोटींचा मानहानीचा खटलाही दाखल केला आहे. त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, मलिकांच्या आरोपांमुळे चुकीची बदनामीकारक माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे मोहित भारतीय यांचे नाव बदनाम होत आहे. त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसत आहे.
मोहित भारतीय यांनी आपल्या याचिकेत भाजपाशी संबंध असल्याचं म्हटलं आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चातल्या आपल्या पदाचा उल्लेख केला आहे. व्यवसायात असून त्यांनी मलिकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाचा पूर्णपणे तपास होईपर्यंत न्यायालयाने आदेश द्यावा आणि मलिक यांना असे वक्तव्य करण्यापासून परावृत्त करावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.
निरंजन डावखरेंचं मलिकांना प्रत्युत्तर
काही गुन्ह्यांमधील आरोपी किरण गोसावी हा आर्यन खान प्रकरणात पंच असल्यानं खूपच वाद झाला. हा किरण गोसावी हा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याच्या पत्नीसोबत एका कंपनीत संचालक आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी केला होता.
त्यानंतर भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि ठाणे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या पत्नीसोबत किरण गोसावी एका कंपनीत संचालक असल्याचे आरोप समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागले.
- भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषद घेत या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
- निरंजन डावखरे यांच्या पत्नीसोबत एका कंपनीमध्ये किरण गोसावी नावाचे संचालक आहेत.
- पण हे किरण गोसावी म्हणजे आर्यन खान प्रकरणातील पंच किरण गोसावी नसून त्याच नावाची वेगळी व्यक्ती आहे.
- पत्रकार परिषदेत निरंजन डावखरे यांनी या दुसऱ्या किरण गोसावींना माध्यमांसमोर सादर केले.
- त्यावेळी बोलताना ‘खोदा पहाड पार निकाल चुहा भी नही’ असे म्हणत डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्ला चढवला आहे.
- तर शेजाऱ्याने दिलेला गांजा फुकून आरोप करताना जरा अभ्यास करावा असा टोलाही डावखरे यांनी लगावला आहे.