मुक्तपीठ टीम
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी आयोजित केलेली ट्रक्टर रॅलीला हिंसक वळण मिळाले होते. याच मुद्द्यावर आज भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. तसेच शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.
“रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाही. तसेच आवश्यक असल्यावरच फेसबुक पोस्ट करणारे शरद पवार साहेब तुमची जवान आणि पोलिसांच्या बाजूने पोस्ट का आली नाही? शेतकरी आंदोलनामध्ये वेगळ्या शक्तींचा वावर आहे. त्यांचे समर्थक शरद पवार आणि संजय राऊत तुम्ही आहात. तुम्ही आता का गप्प आहात? हा प्रश्न आम्ही देशवासियांच्या वतीने विचारत आहोत,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
“केंद्र सरकारने २०१४ पासून २०२० पर्यंत जनहिताचा निर्णय घेतला की लाँग मार्च ते आंदोलन, पुरस्कार वापसी ते पुरस्कार वापसी करणाऱ्यांचं समर्थन ही सातत्याने भूमिका या देशातील शहरी नक्षलवादी आणि खासकरुन मोदी विरोधकांनी घेतली आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली. तसेच “केवळ राजकीय सूडापोटी आणि मोदी द्वेषापोटी या देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुर्दैवाने शिवसेना अराजकता आणू पाहत आहे” असंही ते पुढे म्हणाले आहेत.
भाजप नेते आशिष शेलार यांनी शरद पवारांवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. ‘दिल्ली पोलीस आणि जवानांनी जो परमोच्च कोटीचा संयम दाखवला, तो त्यांच्या देशभक्तीचा परिचय होता. विरोधकांना गोळीबार हवा होता का? माथी भडकवण्याचे काम शरद पवारांकडून अपेक्षित नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयमाची भाषा करू नये. माथेफिरूंचे समर्थक म्हणून काम करू नये. पोलिसांनी दोषींसोबतच माथेफिरूंचं समर्थ करणाऱ्यांपर्यंतही पोहोचावे. तसेच आंदोलनाला तीव्र रुप देणाऱ्यांची चौकशी व्हायलाच पाहिजे. पण ज्यांनी याचे समर्थन केले, त्यांचीही चौकशी व्हायला हवी’, असेही ते म्हणाले.
“२००३ पासून ज्यांनी कृषी कायद्याची वकिली केली ते आज संयमाच्या चर्चेची गोष्ट करत आहेत. १४ वर्षानंतर तरी वनवास समाप्त होतो पवार साहेब…१७ वर्ष झाली कायदा आणून आणि चर्चा करुन आणि अजूनही तुम्हाला चर्चा करायची आहे. याचा अर्थ चर्चेचे बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचे आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.