रॉबिन डेव्हिडसन
बिरोबाच्या नावानं चांगभलं…एकच गजर आसमंतात. ढोल-कैताळाचा निनाद. भंडार्याची उधळण. सांगली जिल्ह्यातील बिरोबाची प्रसिद्ध यात्रा सध्या सुरु आहे. विविध राज्यातील लाखो भाविकांची गर्दी लोटलीय. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवालय लाखोंचे श्रद्धास्थान आणि धनगर सामाज्याचे आराध्य दैवत आहे. बिरोबाच्या प्रसिद्ध यात्रेसाठी विविध राज्यातील साडेतीन लाख भाविक या ठिकाणी दाखल झाले आहेत. ढोल-कैताळाचा निनाद, भंडार्याची उधळण आणि ‘चांगभलं’च्या गजरात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने बिरोबा देवाच दर्शन घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष यात्रा झाली नव्हती, यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात भरवण्यात आली आहे.
मिरज पंढरपूर राज्य मार्गवर आणि कवठेमहांकाळ पासून वीस किलोमीटर वर श्री बिरोबा मंदिर आहे. हे मंदिर आठव्या शतकातील आहे. गुढीपाढव्यानंतर या ठिकाणी मोठी यात्रा भरते. श्री बिरोबा देवस्थानाबाबत सांगण्यात येणारी आख्यायिका अशी आहे. श्री बिरोबा प्रथम कोट्टबेळगी कर्नाटक राज्यातून ढालगावच्या डोंगरावर जंगलात आले. तेथून बनात येऊन वारूळावर स्वयंभू अवस्थेत प्रगटले. तेथे तीन मूर्ती आहेत. त्यांना गोपाना , सुऱ्याबा आणि विठोबा संबोधले जाते. ब्रम्हा, विष्णू, महेश यांची ही रूपे आहेत, असेही म्हटले जाते. बिरोबांना शंकराचा अवतारही मानले जातं. सुऱ्याबा या भक्ताने बिरोबाची मनोभावे सेवा केल्याने सुऱ्याबाला शेजारी स्थान दिले आहे. लगतच महादेवाची पिंड आहे. मेंढ्यापालन करणाऱ्या समाजाला म्हणजेच धनगरांना वर्षभर भटकंती करावी लागते. यात्रेनिमित्त सर्वजन एकत्र येतात. सामूहिक भोजन करतात. दुसऱ्या दिवशी गोडा आणि तिसऱ्या दिवशी खारा नैवेद्य असतो.
यात्रेसाठी आलेल्या भाविकांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थानच्या दगडी टाकीबरोबरच मंदिर परिसरात पाच पाण्याच्या टाक्यांमध्येही पाण्याची व्यवस्था आहे. आरोग्य विभागामार्फत पाणी निर्जंतुक केले जात आहे. या ठिकाणी एक आरोग्य शिबिराच पण आयोजन करण्यात आलं आहे.
यात्रेत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बिरोबा बन परिसरात पोलीस अधिकारी आणि शंभरांवर पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत.जागोजागी पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला.
यात्रेकरूंना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य पथक चोवीस तास सेवा देत आहे. यात्रेकरूंच्या सेवेसाठी एस.टी. महामंडळाच्या सांगली विभागामार्फत आरेवाडी बनात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आरेवाडी ग्रामस्थ आणि पुजारी परिश्रम घेत आहेत.