मुक्तपीठ टीम
भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते पण शेवटी ती दुर्दैवी बातमी आलीच. अनेक आघाड्यांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणाऱ्या संरक्षण दलाच्या प्रमुखांचा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत असा मृत्यू होणे नियतीलाही मान्य असणार नाही. जनरल रावत आणि त्यांची पत्नी तसेच अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे खूप व्यथित झालो आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे. ही दुर्घटना अत्यंत विषण्ण करणारी, दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.
संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी व सोबतच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला आहे. या शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 8, 2021
आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारताचे संरक्षण दल हे सुसज्ज आणि बलशाली आहे. या तीनही दलांचे असे संयुक्त प्रमुखपद भूषवण्याचा पहिला गौरवही दिवंगत जनरल रावत यांना मिळाला. त्यांची कारकीर्दही त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि पदाला साजेशीच अशी होती. संरक्षण दलाला तडफदार आणि सर्व आघाड्यांवर ठसा उमटविलेले अनुभवी असे नेतृत्व मिळाल्याने आपल्या तीनही दलांचे मनोबल उंचावले होते, त्याचे प्रत्यंतरही अलिकडच्या तीनही दलांच्या कामगिरीतून दिसते.
दुर्घटनेत दिवंगत रावत यांच्या पत्नीसह सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ब्रिगेडीयर आणि लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही अंत झाला आहे, हे अत्यंत दुःखद आहे. सुरक्षेतील कुशल, अनुभवी आणि धडाडीचे नेतृत्व गमावणे हे देशाच्या दृष्टीने मोठे नुकसान आहे. एकंदर दुर्घटनाच सबंध देशासह आपल्या सर्वांचे मन विषण्ण करणारी आहे. या सर्व शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली
देशाचे संरक्षणदल प्रमुख ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबिय व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी धक्कादायक तितकीच वेदनादायक आहे. pic.twitter.com/ozJKIkHmb9
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 8, 2021
“देशाचे संरक्षणदल प्रमुख ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबिय व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी धक्कादायक, तितकीच वेदनादायक आहे. जनरल बिपीन रावत यांनी त्यांच्या लष्करीसेवेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत गाजवलेले शौर्य, पराक्रम, त्यांची देशभक्ती देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. युवकांना सैन्यदलात दाखल होण्यासाठी प्रेरणा देईल. जनरल बिपीन रावत यांनी भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून देशाची संरक्षणसिद्धता, गौरव वाढवण्यात योगदान दिले. लष्करप्रमुखपदानंतर तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची, संरक्षणदलप्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. पहिले संरक्षणदलप्रमुख म्हणून तिन्ही सैन्यदलांमध्ये सहकार्य, समन्वय वाढवण्याचे काम केले. प्रदीर्घ लष्करी सेवेत असंख्य लढाया, मोहिमा यशस्वी केल्या. युद्धात आघाडीवर राहून सैन्याचे नेतृत्वं केले. सहकारी अधिकारी, जवानांचे मनोबल कायम उंच ठेवण्यासाठी प्रयत्नशील असे त्यांचे नेतृत्वं होते. त्यांच्यासारख्या भारतमातेच्या वीर सुपुत्राचे झालेले अपघाती निधन ही देशवासियांच्या मनाला चटका लावणारी, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारी घटना आहे. ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपिन रावत, दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या त्यांच्या पत्नी आणि लष्करी अधिकारी यांना मी वंदन करतो. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्वांच्या राष्ट्रसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपिन रावत यांच्यासह दुर्घटनेत मृत्यू पावलेले त्यांचे कुटुंब व अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.