मुक्तपीठ टीम
जगात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण सुरु असतानाच मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांनी भविष्यात आणखी मोठ्या महामारीचा इशारा दिला आहे. गेट यांनी जारी केलेल्या अलर्टला खूपच गंभीरतेने घेतले जात आहे, कारण त्यांनी पाच वर्षांपूर्वीच कोरोनासारख्या महामारीच्या संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता. आता कोरोना विषाणूच्या महामारीनंतर बिल गेट्स यांनी आणखी दोन आपत्तींचा इशारा दिला आहे.
२०१५ मध्ये बिल गेट्स यांनी दिलेला इशारा २०२०मध्ये खरा ठरला. अजून लोकांची कोरोनासारख्या भयानक महामारीतून पुर्णपणे सुटका झाली नाही. तसेच कोरोनावरील लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली सुद्धा नाही, अशा वेळी गेट्सच्या यांच्या भविष्यवाणीमुळे धडकी भरणे स्वाभाविकच आहे. पण त्यांचा हेतू लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यापेक्षा संबंधित यंत्रणेना दक्ष करण्याचा आहे.
बिल गेट्स यांच्या मते कोरोना महामारीनंतर भयानक आपत्ती येणार आहे. लोक अगोदरच सावध राहतील आणि भविष्यातील या संकटापासून स्वत: चे रक्षण करण्यासाठी कार्य करतील यासाठी त्यांनी हा अंदाज वर्तविला आहे.