मुक्तपीठ टीम
प्रोजेक्ट आरोग्यमच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात बाइक रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. बाइकलाच असलेल्या साइड कारमध्य रुग्णासाठी खास व्यवस्था तयार करण्यात आली आहे. त्यात स्ट्रेचर, ऑक्सिजन, अतिरिक्त बॅटरी, पंखा अशा सर्व सुविधा आहेत. विशेष म्हणजे कोरोना संकट काळातील संसर्गाचा धोका लक्षात घेऊन संपूर्णतः विलगीकरण असलेली ही बाइक ॲम्बुलन्स आहे. विशेषतः दुर्गम भागातील रुग्ण व गर्भवती महिलेसाठी तयार करण्यात आली आहे. सध्याच्या कोरोना काळातही त्याचा उपयोग करता येईल. जव्हार, मोखाडा सारख्या दुर्गम ठिकाणी या बाईक ॲम्बुलन्स उपयोगी पडतील या हेतूने बनवण्यात आल्या असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक निरंजन आहेर यांनी यावेळी दिली.
या रुग्णवाहिकेसाठी असणारे चालक हे वैद्यकीय ज्ञान असणारे (वैद्यकीय प्रशिक्षित स्वयंसेवक)असतील. पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात रस्त्याशी जोडले न गेलेले असे एकूण २२ पाडे आहेत.तसेच पावसाळ्यात किंवा अन्य वेळीही गरोदर मातांना झोळीतून रुग्णालयात आणावे लागते हा प्रश्न लक्षात आल्यावर अलर्ट सिटीझन फोरम आणि एसबीआय ने ही बाइक ॲम्बुलन्सची संकल्पना अमलात आणली. ज्या रस्त्यावरून मोटरसायकल जाते त्या रस्त्यावरून या बाईक रुग्णवाहिके मधून गरोदर मातांना किंवा गंभीर स्थितीतील रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचणे शक्य होईल तसेच त्यामुळे रुग्णांचे जीव वाचून मातामृत्यू ही टळतील असे मत यावेळी जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले.
या अंबुलन्स जव्हार मोखाडा सारख्या दुर्गम ठिकाणी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पुरवण्यात येतील. सध्या दोन ॲम्बुलन्स संस्थेने दिल्या असून आणखी २३ ॲम्बुलन्स संस्थेकडून पुरवण्यात येणार आहेत अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आमदार श्रीनिवास वनगा आणि जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अद्ययावत बाईक ॲम्बुलन्स चे अनावरण करण्यात आले. अलर्ट सिटीझन फोरम मुंबई आणि स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत पालघर जिल्ह्यासाठी या बाईक पुरवण्यात आल्या.
संस्थेचा हा स्तुत्य उपक्रम असून आदिवासी भागासाठी जेथे चार चाकी वाहन पोहोचू शकत नाही अशा ठिकाणांसाठी ह्या ॲम्बुलन्स नक्कीच उपयोगी पडतील असे मत यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केले.
पाहा व्हिडीओ: