मुक्तपीठ टीम
पर्यटकांचे सर्वात आवडते केंद्र महाबळेश्वर-पाचगणी आता एका क्लिकवर आले आहे. येथील हॉटेल, पर्यटनाची ठिकाणे, टॅक्सी, दर्शनी पॉईंट्स, खाद्यपदार्थ यासह इतर सर्व प्रकारच्या सेवा एका क्लिकवर व क्यूआर कोडवर उपलब्ध झाल्या आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप ‘बिज्जो’ने महाबळेश्वरसाठी खास ‘गो महाबळेश्वर’ हे संकेतस्थळ, ऍप व क्यूआर कोडची निर्मिती केली आहे. शहरातील ट्रॅव्हल आणि टुरिझम परिसंस्थेला एकाच क्यूआर कोडवर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे संकल्पक आणि ‘बिज्जो’चे संस्थापक विनीत तोष्णीवाल यांनी सांगितले.
‘येथे सर्व काही’ असे घोषवाक्य घेऊन निर्मिलेल्या ‘गो महाबळेश्वर’चे लोकार्पण नुकतेच महाबळेश्वर येथील हॉटेल कोर्टयार्ड मेरिएट येथे झाले. महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, श्रीकांत तिडके, खासदार श्रीमंत छत्रपति उदयनराजे भोसले यांचे सचिव सुनील काटकर, भिलार हॉटेल असोसिएशनचे प्रमुख राहुल भिलारे, महाबळेश्वर हॉटेल असोसिएशनचे रोहन कोमटी, माजी अध्यक्ष डी. एम. बावळेकर, महाबळेश्वर टॅक्सी असोसिएशनचे प्रमुख अंकुश बावलेकर, पोलीस उप निरीक्षक भागवत आदी उपस्थित होते.
विनीत तोष्णीवाल म्हणाले, “सेवा क्षेत्रातील लघु व मध्यम व्यावसायिकांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘बिज्जो’ सुरु झाले. यातील पहिल्या मायक्रोसाईटचे लोकार्पण येथे होत आहे. ‘गो महाबळेश्वर’मध्ये येथील पर्यटनाशी संबंधित सर्व व्यावसायिकांना जोडले आहे. जवळपास ४५० पेक्षा अधिक छोटे-मोठे व्यावसायिक या अॅपवर आहेत. संपूर्ण शहराची प्रवास-पर्यटन परिसंस्था एका क्यूआर कोडवर असल्याने ग्राहक आणि प्रवाशांच्या सर्व गरजा, सेवा पुरवण्यासाठी ‘गो महाबळेश्वर’ उपयुक्त ठरेल. पर्यटकांना बुकिंगसाठी शोधाशोध किंवा रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर थेट व्यावसायिक आणि पर्यटक यांच्यात व्यवहार होणार असल्याने कमिशन वाचणार असून, पर्यटकांना सवलती, तर व्यावसायिकांना अधिक नफा मिळणार आहे.”
“आत्मविश्वासाने समृद्ध आणि आत्मनिर्भर समुदायाला चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्थानिक व्यवसाय एकमेकांशी स्पर्धा आणि सहयोग करतील. हा उपक्रम महाबळेश्वर टॅक्सी युनियन, रिसॉर्ट्स आणि हॉटेल असोसिएशन, स्थानिक पर्यटन प्राधिकरणे आणि फार्म स्टे समूहांसारख्या स्थानिक संघटनांच्या सहकार्याने राबविण्यात आला आहे. ‘बिज्जो’चे संपूर्ण भारतात २० हजार लहान व स्वतंत्र व्यवसायांचे नेटवर्क आहे. वाराणसी, जयपूर, उत्तराखंड, ऋषिकेश, हरिद्वार, उदयपूर, मुंबई, पुणे, महाबळेश्वर, बंगळुरू आणि म्हैसूर येथील अनेक हॉस्पिटॅलिटी व्यवसायांनीही ‘बिज्जो’च्या सेवांमध्ये स्वारस्य दाखवले आहे. बिज्जोने २०२३ पर्यंत देशभरातील २० लाख व्यवसायांना जोडण्याची आणि ‘गो वाराणसी’, ‘गो म्हैसूर’, ‘गो पुणे’ अशा वेबसाईट बनवण्याची योजना आखली आहे,” असे तोष्णीवाल यांनी नमूद केले.
‘गो महाबळेश्वर’ची वैशिष्ट्ये
• हॉटेल्स, व्हिला, टॅक्सी, साहसी खेळ, थीम पार्कचे बुकिंग शक्य
• एका क्लिकद्वारे महाबळेश्वरच्या सर्व सेवा उपलब्ध
• महाबळेश्वरला भारतातील पहिले डिजी पर्यटन शहर म्हणून ओळख
• ऍग्रीगेटर्सवर अवलंबून राहण्याची गरज नाही
• स्थानिक ट्रॅव्हल व टुरिझम परिसंस्थेच्या वाढीला प्रोत्साहन
• डिजिटल प्रभावाने ग्राहक थेट व्यवसायांशी जोडणार