मुक्तपीठ टीम
अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर देशासह राज्यातल्या पाऊस, पाणी, कृषीक्षेत्र, राजकीय, समाजिक विषयांवर भेंडवळची भविष्यवाणी झाली आहे. या भविष्यवाणीनुसार राजा कायम असणार आहे. पण देशातील महामारी आणि आर्थिक संकट वाढणार आहे. त्यामुळे राजावर ताण असणार आहे. पाऊस सर्वसाधारण राहणार असला तरी पिकांची नासाडी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
३५० वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यात अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर भेंडवळमध्ये भविष्यवाणी केली जाते. यंदा लॉकडाऊनचे नियम पाळत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत घटमांडणी करून त्यातून झालेल्या हालचालीवरुन भविष्यवाणी जाहीर करण्यात आलीय. यानुसार यंदा पाऊस सर्वसाधारण राहणार आहे. मात्र देशावर महामारी आणि आर्थिक संकट ओढावण्याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. तसंच घुसखोरीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा: भेंडवळची भविष्यवाणी: साडे तीनशे वर्षांची परंपरा…वर्तवतात तरी कशी?
काय आहे भेंडवळची भविष्यवाणी ?
– यंदा राज्यात सर्वसाधारण पाऊस पडेल. जून महिन्यात साधारण, जुलैमध्ये चांगला, ऑगस्टमध्ये कमी आणि सप्टेंबर महिन्यात कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
– शेतीचं पिकही साधारण राहील. पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. चारा टंचाई भासेल.
– देशावर नैसर्गिक आपत्ती ओढावू शकते.
– देशाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
– पृथ्वीवर नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्तीसुद्धा येऊ शकते. रोगराईचे संकट येईल, त्यामुळे देशातील आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत होईल.
– देशाचा राजा कायम असेल. मात्र आर्थिक स्थिती खालावू शकते आणि जगावर आर्थिक संकट येईल. राजावरील ताण वाढेल, शिवाय संरक्षण खात्यावरही ताण येईल. परकीयांची घुसखोरी वाढेल.