भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालायाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांना जीव गमवावा लागला. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
तसेच रुग्णालयाच्या नवजात शिशू केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, दुर्घटनाग्रस्त शिशू केअर युनिटची पाहाणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून करण्यात आली. या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतानाच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अशा दुर्घटना घडू नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांना खबरदारीच्या उपायांची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच आवश्यक ते निर्णय घेतले जातील असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांची वीज यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणेची तत्काळ तपासणी करण्याच्या सूचना राज्यमंत्री यड्रावकर यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाला दिल्या आहेत.