मुक्तपीठ टीम
बहुचर्चित भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भय्यू महाराज यांच्या दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याच्या मागणीसाठी पत्नीने न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली असून, त्याची दखल घेत न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भय्यू महाराज यांच्या पत्नी डॉ. आयुषी देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे की, मोलकरीण पलक पुराणिक, सेवादार विनायक दुधाडे आणि शरद देशमुख यांना सुनावण्यात आलेली सहा वर्षांची शिक्षा अपुरी आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी २८ जानेवारी रोजी दिलेल्या निर्णयाला रिव्हिजनने आव्हान दिले असून, दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे पलक पुराणिक, विनायक दुधाडे आणि शरद देशमुख यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि कट रचणे या गुन्ह्यात न्यायालयाने प्रत्येकी सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.
भय्यू महाराज यांच्या पत्नीने सांगितले की, ज्या कलमात शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्या कलमात १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. अशा परिस्थितीत सहा वर्षांची शिक्षा कमी असल्याने त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. त्यावर उच्च न्यायालयाने संबंधित गुन्हेगार आणि तेजाजी नगर पोलिसांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ मार्च रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. येथील तिन्ही आरोपी सध्या कारागृहात असून, सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांची जामिनावर सुटका करावी, असा अर्जही त्यांनी उच्च न्यायालयात केला आहे.
१५० साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले
- फेब्रुवारी महिन्यात भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा निकाल आला होता, ज्यामध्ये तीन दोषींना सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
- यात १५० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून ३२ सुनावणीनंतर निकाल आला आहे.
- तीन वर्षांहून अधिक काळ खटला चालला.
- भैय्यू महाराज यांचा नोकरदारांनी इतका छळ केला की त्यांनी आत्महत्या केल्याचे न्यायालयाने मान्य केले.
- त्याच्याकडून ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करण्यात आली, त्यामुळे त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.