मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवी नीती स्वीकारल्याची चर्चा सुरु झाली आहे. सप्टेंबरमध्ये दिल्लीत मशिदींना भेट देत मौलवींशी चर्चा केली होती. आजवर इतर नेत्यांनी तसं केलं तर मुसलमान अनुनयाचा आरोप करणाऱ्या हिंदुत्ववादी विचारांमधून मुसलमानांशी संवादासाठी सुरु झाल्याने खळबळ माजणं स्वाभाविकच होते. पण देशातील वातावरण लक्षात घेता, असे प्रयोग राष्ट्रहितासाठी आवश्यक असल्याचं संघ समर्थकांकडून सांगण्यात आलं. आता नागपूरमधील कार्यक्रमात त्यांनी ‘वर्ण’ आणि ‘जात’ पूर्णपणे संपुष्टात आणली पाहिजे असं प्रतिपादन केले. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत संघाचा प्रतिगामी चेहरा बदलून तो उदारमतवादी राष्ट्रवादी करण्याच्या नव्या नीतीवर काम करत आहेत का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
जातीव्यवस्थेला आता महत्व नाही, विषमता हद्दपार व्हावी!
शुक्रवारी नागपुरात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, जातिव्यवस्थेला आता काही महत्त्व नाही. डॉ. मदन कुलकर्णी आणि डॉ. रेणुका बोकारे यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘वज्रसुची टुंक’ या पुस्तकाचा हवाला देत मोहन भागवत म्हणाले की, सामाजिक समता हा भारतीय परंपरेचा एक भाग होता, पण त्याचा विसर पडला आणि त्याचे घातक परिणाम झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणाले की, ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होतो, त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. देशातील आधीच्या पिढ्यांनी विविध ठिकाणी अनेक चुका करून ठेवल्या आहेत. त्या चुका मान्य करण्यात कसलीही अडचण असायला नको. आपल्या पुर्वजांच्या चुकांमुळे आपल्याला कमीपणा वाटता कामा नये. कारण अशा चुका प्रत्येकाच्याच पुर्वजांनी केल्या आहेत.
सप्टेंबरमध्ये घेतली होती मौलवींची भेट
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सप्टेंबरमध्ये अनेक मौलवींची बैठक घेतली आणि दिल्लीतील मशिदी आणि मदरशांनाही भेट दिली. त्यानंतर ते म्हणाले की, अल्पसंख्याकांना धोका नाही, त्यांची भीती घालवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना कार्यरत राहतील.