मुक्तपीठ टीम
सध्या देशात कोरोनाचे सावट असताना ते रोखण्यासाठी मास्क वापरणे अनिवार्य आहे. मास्क वापरल्याने कोरोना पसरविणार्या सार्स-सीओव्ही -२ विषाणूचा प्रसार रोखतो. अनेक संशोधनातून आश्चर्यकारक निष्कर्ष पुढे आले आहेत की, मास्कचा वापर करणार्यास कोरोना संसर्ग झाला असल्यास, हा रोग सौम्य राहतो. अमेरिकेच्या नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूटच्या, जोसेफ कोर्टनी आणि एड बेक्स या दोन संशोधकांना त्याचे कारण सापडले आहे.
मास्क वापरल्याने नाकात आणि तोंडात प्रवेश करणाऱ्या संसर्गजन्य कणांची संख्या कमी होते. त्यामुळे अनेक लोक असा विचार करतात की, यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता कमी होईल. पण तसे नाही आहे. एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसांपर्यंत या विषाणूचे कण कुठपर्यंत पोहचले आहेत यावर या आजाराची गंभीरता अवलंबून असते. पातळ कपड्याचे मास्क वापरल्याने लहान एरोसॉल कणांच्या प्रतिकारास कमी प्रमाणात रोखले जाऊ शकते. हे कण खोलवर जाण्याची शक्यता आहे. नाक आणि श्वसनमार्गामध्ये असणारा कफ सारखा द्रवपदार्थ, व्हायरस आणि बॅक्टेरियापासून संरक्षण करतो.
डॉ. कोर्टनी आणि डॉ. बेक्स हे म्हणतात की, मास्कचा पृष्ठभाग ओला होतो कारण, जेव्हा एखादी व्यक्ती श्वास बाहेर टाकते, तेव्हा पाण्याची वाफ मास्कच्या आत राहते. त्यानंतर, श्वास घेतल्यावर कोरडी हवा मास्कद्वारे तयार झालेल्या वाफेच्या पाण्यासह, श्वसनमार्ग आणि फुफ्फुसांमध्ये परत येते. यामुळे मास्कचा वापर करणार्यांच्या रोग प्रतिकारशक्तीला याचा फायदा होतो.
जाड कपड्याचे मास्क अधिक फायदेशीर असतात. संशोधकांनी ३७ डिग्री , २२ डिग्री आणि ८ डिग्री तापमानात अनेक मास्कची चाचणी केली. त्यांना आढळले की, सर्व मास्क काही प्रमाणात दमटपणा वाढवतात. पण जाड कपड्याचा मास्क अधिक चांगला आहे. गरम खोलीत याचा दमटपणा ५० टक्क्यांहून अधिक वाढला. तर, थंड खोलीत हे ३०० टक्क्यांपर्यंत पोहोचले. इतर मास्कपासून हा दमटपणा १५० ते २२५ टक्क्यांपर्यंत आहे.