मुक्तपीठ टीम
स्मशानभूमी म्हटलं की, उदासवाणं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण जोगेश्वरी पूर्वेकडील प्रतापनगरमधील हिंदू स्मशानभूमी पाहिली तर सर्वांना आश्चर्यचं वाटतं. या स्मशानभूमीची भिंत सुंदर चित्रांनी सजवण्यात आलीय. त्यामुळे तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कलात्मक अविष्कारानं नजराही सुखावतात. स्वच्छ, सुंदर आणि प्रदुषणमुक्त स्मशानभूमी येथे बांधण्यात आली आहे.
पूर्वी इतर स्मशानभूमीप्रमाणेच इथेही अनेक समस्या होत्या. दफनभूमी, शवदाहिनी, पर्जन्य वाहिन्या, मृत्यू नोंदणी कार्यालय, वखार मोडकळीस आली होती. याबाबत पालिकेच्या के-पूर्व विभागात अनेकदा तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या.अखेर पालिकेने ही स्मशानभूमी तोडून पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला आणि आज या प्रतापनगर हिंदू स्मशानभूमीचा कायापालट झाला आहे. गेल्या काही वर्षांत या स्मशानभूमीच्या डागडुजीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले असून सुसज्ज अशा स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीवर सुंदर चित्रही काढण्यात आले आहेत.
प्रतापनगर स्मशानभूमीमध्ये आल्यावर शंकराची मूर्तीचं दर्शन घडतं. तिथं पादचारी पायवाटा बांधण्यात आल्यानं पावसाळ्यातही अडचण होत नाही. स्टेनलेस स्टील रेलिंगही उभारलं आहे. हिंदू स्मशानभूमीत दहनामुळे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी तेथे विशेष सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना धुरांचा त्रास होत नाही. त्यासाठी योग्य ती यंत्रणा उभारून उंच धुरांडं बसवण्यात आलं आहे.
येथील स्मशानभूमीच्या भिंतीलगत झालेली दुरवस्था दूर करून लादीकरण करण्यात आले. संरक्षक भिंतींवर चांगली चित्रं काढून ती सुशोभित करण्यात आली. भिंतीवर आयुष्यावर आधारीत काही विचारही मांडण्यात आले आहेत. मुलगी वाचवा, स्त्री जन्माचे स्वागत करा. रक्तदान, द्या अंधांना दृष्टी पाहतील तेहीं सुंदर सृष्टी, असे विचार या भिंतीवर मांडण्यात आले आहे. तसेच मंदिर, साधु-संत, गड किल्ल्याची चित्रं या भिंतीवर काढण्यात आली आहेत.
काय म्हणाले आमदार रवींद्र वायकर?
मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून मी तो संपूर्ण स्मशानाचा परिसर विकसित करत आहे. त्यात आणखी सुधारणा होईल. आता ही सुधारणा झाली आहे ती अत्यंत चांगली झाली आहे. याच्या अगोदर मी शिवधाम स्मशानभूमी बांधलेली आहे ती पाहा ती तर याच्यापेक्षा ही चांगली आहे. जवळ जवळ त्याच्यावर साडेचार कोटी खर्च केलेला आहे दोन कोटी मी माझा आमदार फंडातून खर्च केला आहे. माझा अगोदरचे जे आमदार होते त्यांनी थोडा खर्च केला होता. किर्तीकर साहेबानी खर्च केला होता, सुभाष देसाई साहेबांनी खर्च केला होता. मी आल्यावर मी दोन कोटी खर्च केला आणि एक ट्रस्ट आहे तिथे त्या ट्रस्टच्या माध्यमातून खर्च करून आज ती शिवधाम स्मशानभूमी महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आहे आणि त्याच्यानंतर आता मी ही बनवतोय.
सभोतालच्या ४० घरांचे पुनर्वसन झाले तर मी ही आणखीन सुधारेन. सुशोभीकरण झालेलच आहे तिकडे पण आणखीन स्वच्छता सुशोभीकरण करेन आणि या फंडातून मी आणखीन निधी घेतला आहेत आणि आणखीन सुख सुविधा येणाऱ्या लोकांना मिळाव्यात म्हणजे पाण्याची सोय शौचालायाची सोय, बसायची सोया प्रार्थनाची सोय पुन्हा लहान मुलांना पुरतो त्याची जागा कमी होती ती जागा वाढवून घेतली त्यात भित्ती चित्र काढलेली आहेत देऊळ आतमध्ये बनवतोय वाचनालय आतमध्ये करतोय तर या सर्व गोष्टी चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कोरोना काळात तर मी तिथे जाऊन उभा राहून बघायचो कारण त्यावेळी जवळ जात येत नव्हतं. पण कोरोनामध्ये पण आम्ही जास्तीत जास्त वेळा स्मशानात गेलोय. त्यावेळेत भीतीदायक वातावरण असताना देखील आम्ही स्वच्छता केली आहे.