मुक्तपीठ टीम
ओमायक्रॉनमुळे जगाची चिंता वाढवली आहे. हा व्हेरिएंट कमी घातक असला तरी त्याचा फैलाव झपाट्याने होत आहे. मात्र असं असताना जगातील काही तज्ज्ञांकडून ओमायक्रॉनला घाबरू नका, एक प्रकारे तो नैसर्गिक लस असल्याचे पसरवले जात आहे. मात्र, ओमायक्रॉनला नैसर्गिक लसीसारख भासवणे ही एक धोकादायक कल्पना आहे, असे मत वैद्यकीय विश्वातील अनेकांकडून मांडलं जात आहे.
कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य मानल्या जाणाऱ्या ओमायक्रॉन प्रकाराबाबत आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार, त्याचा संसर्ग कमी तीव्र असला तरी तो अत्यंत संसर्गजन्य आहे. यामुळे, बाधित लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमी आहे आणि त्यामुळे मृत्यूची संख्या देखील तुलनेने कमी आहे. या सर्व कारणांमुळे काही तज्ज्ञ असे म्हणताना दिसतात की ओमायक्रॉन ही एक नैसर्गिक लस आहे आणि ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर कोरोना महामारी संपेल.
काही तर आणखी पुढे जातात, ते म्हणतात ओमायक्रॉन ही एक नैसर्गिक लस म्हणून काम करेल आणि कोरोनाचा अंत करेल. पण विषाणू तज्ज्ञ अशांना बेजबाबदार म्हणतात. ते म्हणतात, ओमायक्रॉन ही नैसर्गिक लस आहे ही कल्पना धोकादायक आहे, जी बेजबाबदार लोकांकडून पसरवली जात आहे.
ओमायक्रॉन संसर्ग डेल्टा प्रकारापेक्षा नक्कीच कमी गंभीर आहे, परंतु ही एक नैसर्गिक लस आहे असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे आणि यामुळे गोंधळ होईल. लस घेतल्यानंतरही हा संसर्ग होत आहे आणि त्यामुळे लोकांचा मृत्यूही झाला आहे, त्यामुळे याला लस समजणे ही मोठी चूक आहे.
कोरोना नाहीच असे म्हणणारे मृत्यू का नाही थांबवत?
अनेक तज्ज्ञ माध्यमांमधून प्रसिद्धी मिळवत कोरोना वगैरे काही नाही, असे मांडत असतात. अशाच एका तथाकथित सकारात्मक तज्ज्ञांचा कोरोनानेच मृत्यू ओढवला होता. आताही जे तज्ज्ञ तसे मांडताना दिसतात ते आधीच्या लाटांमधील मृत्यू, ते कार्यरत असलेल्या देशांमधील संसर्ग आणि मृत्यू थांबवण्यासाठी आपल्या ज्ञानाचा का उपयोग करत नाहीत, असाही प्रश्न वैद्यकीय व्यावसायिक विचारत आहेत. ओमायक्रॉन कमी प्रभावी असल्याने संसर्ग लवकर होऊन तो ओसरेल. पण तो कोरोनाचाच एक प्रकार असल्याने त्याच्या शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे होणाऱ्या नुकसानीचे काय? असाही प्रश्न महत्वाचा आहे.