मुक्तपीठ टीम
मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील महापौर निवास येथे विकसित करण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उद्योग मंत्री तथा स्मारकाचे सचिव सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, खासदार विनायक राऊत, आमदार सदा सरवणकर, आमदार रोहीत पवार, मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. पवार, महसूल मंत्री श्री. थोरात यांच्या हस्ते महापौर निवासाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून स्मारकाच्या कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रांगणामध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
या ठिकाणी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात चित्रफितीच्या माध्यमातून स्मारकाविषयी सादरीकरण करण्यात आले. मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांसह वास्तुविशारद आभा लांबा, विकासक टाटा कंपनीचे विनायक देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह या भूमिपूजन समारंभाचे नियोजन करण्यात आले होते. त्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले.
राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली आहे. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तू उभारणीचा पहिला टप्पा 14 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. या ठिकाणी वस्तुसंग्रहालय, कलादालने, संशोधन केंद्र, संग्राहागार, वाचनालय, चर्चासत्रांसाठी सभागृह असणार असून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या संग्रहालयाला आणि स्मारकाला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत महापौर निवास परिसराचे आणि आतील दालनांचे सुशोभीकरण करण्यात येणार असून छोटेखानी इमारती आणि भूमीगत रचना बांधण्यात येणार आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृति जागवणारं भव्य स्मारक
- बाळासाहेब म्हटले की लाखोंची गर्दी आकर्षित करून घेणारा महान वक्ता. त्यांच्या भाषणांमुळे जास्त गाजलेलं मुंबईच्या ह्रदयस्थानी असलेलं शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थ. त्याच्या सान्निध्यातील महापौर बंगला. बाळासाहेबांचं आवडतं ठिकाण. अरबी समुद्राच्या लाटांसोबत वसलेलं ठिकाण. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी अतिशय समर्पक जागा.

- बाळासाहेबांच्या स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील वास्तुविशारद आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. या आराखड्यानुसार आता बाळासाहेबांचं स्मारक प्रत्यक्षात येईल.

- बाळासाहेबांच्या स्मारकातील वास्तू उभारणीचा पहिला टप्पा पुढील १४ महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणे अपेक्षित आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी २५० कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यासाठी १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सर्व वास्तूंचे बांधकाम होणार आहे.

- पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकूलित यंत्रणा उभारणी, इमारतीची अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगीचा तयार करणे. रेनवॉटर हार्वेस्टिंग, इत्यादी कामांचा समावेश आहे. महापौर बंगल्यात बाळासाहेबांचा जीवनपट उलगडला जाईल. त्यासाठी खास प्रदर्शन असेल.

- बाळासाहेबांना चाफ्याची फुलं आवडत असत. त्यामुळेच स्मारकाच्या आवारात चाफ्याच्या झाडे लावण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चाफ्याची झाडे लावली.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा – LIVE https://t.co/MHeBUoawhW
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 31, 2021








Subscribe