राजेंद्र पातोडे
अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू ह्यांनी सोमवारी जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर जिल्हा रूग्णालयात कोरोना रूग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याने कॅन्टीनमध्ये जात त्याची तपासणी केली. याच कॅन्टीनमध्ये असलेल्या सुनिल मोरे ह्या कंत्राटी स्वयंपाक्याच्या कानाखाली मारले. ही बाब संतापजनक असून आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पातळी सोडून दादागिरीचा पुरावा आहे. स्वयंपाकाच्या कानाखाली मारणे सोपे असते. गोरगरीब माणसाला मारून व्यवस्था बदलत नाही तर व्यवस्थेच्या कानाखाली मारण्याचे धाडस पालकमंत्र्यानी दाखवावे असे आवाहन वंचीत बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केले आहे.
पालकमंत्री म्हणून सुपरस्पेशालिटी सुरू करण्यासाठी दादागिरी करणे अपेक्षित आहे. मात्र पालकमंत्री दादागिरी करताहेत ती सामान्य माणसावर. ही कॅन्टीन साहेबराव कुलमेथे, वरिष्ठ लिपिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्यांचे अखत्यारीत आहे. त्यांनी दररोज तूर आणि मूगदाळ किती लागते असा प्रश्न कॅन्टीनचे प्रमुख कुळमेथे यांना विचारल्यावर त्यांनी २३ किलो असं उत्तर दिलं. हाच प्रश्ननंतर पालकमंत्र्यांनी जेवण बनवणारे स्वयंपाकी सुनिल मोरे यांना विचारल्यावर त्यांनी आठ ते दहा किलो असं उत्तर दिलं. मग चूक कुणाची होती? व्यवस्थापकापेक्षा जास्त दाळ लागत असल्याचे स्वयंपाक्याने सांगितले नव्हते, अश्या वेळी गरीब स्वयंपाक्याला मारणे ही गुंडागिरी कशासाठी आहे, ह्याचे उत्तर पालकमंत्री देतील का? असा सवालही वंचित युवा आघाडीने केला आहे.
मेडीकल कॉलेजमध्ये खोकल्यासह अनेक औषधांचा तुटवडा आहे, मनुष्यबळ तुटवडा आहे, मल्टिविटामिन औषध उपलब्ध नाहीत, कोरोनासाठी मान्यता दिलेल्या हॉटेल आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये अवाच्यासव्या दर आकारणी केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांचे सोबत एमओयू केले असेल तर तो सार्वजनिक का केला जात नाही? लसीकरण करण्यासाठी उपलब्ध लसीचा साठा दोन दिवसांत संपणार आहे, ऑक्सीजन प्लांट का सुरू होत नाहीये, त्यावर मारामारी कधी करणार आहात? ह्याचा खुलासा पालकमंत्री कधी करणार आहेत?
कॅन्टीन मधील निकृष्ट जेवणासाठी मारहाण केलीय, त्या कॅन्टीनचा तपासणी अहवाल अन्न सुरक्षा व मानके कायदे २००६ अंतर्गत १९, २६,२९ जून २०२० रोजी सहाय्यक आयुक्त अन्न औषधी प्रशासन ह्यांनी दिला होता. अन्न सुरक्षा अधिकारी वाकडे आणि गोरे ह्यांनी दिलेल्या अहवालात कॅन्टीनमधील अन्न पदार्थ खाऊन बघितले असता, ते ताजे व पौष्टिक दर्जेदार आहे, रुग्णांना पिण्याचे पाणी पॅकेज ड्रिंकींग वाटर पुरविले जाते, अन्न पदार्थ हाताळणी करणारे कामगार अप्रोन टोपी व हॅन्डग्लोज घालत असल्याचा अहवाल दिला होता. विशेष म्हणजे चारही तपासणी अहवाल छापील प्रोफॉर्मामध्ये आहेत. त्यात अगदी अवाचणीय मराठीत लिहिल्या गेले आहे. अयोग्य अन्न पदार्थ बाबत ऑप्शन देखील नाही, त्यामुळे ह्या बनावट तपासणी अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली कधी वाजवली जाईल? मनपा क्षेत्रात मोठ्या संख्येने रुग्ण असताना मनपाच्या वतीने फॉलोअप नाही, सॅनिटायझेशन नाही, विलगीकरणा असलेल्या रुग्णाची पडताळणी होत नाहीय. अनेक पॉझिटिव्ह रुग्ण घरी राहून उपचार घेत होते, मनपा अधिकारी ह्यांचे कानाखाली कधी आवाज काढणार आहात? ह्या तारखा देखील जाहीर करा, असे आव्हान देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी दिले आहे.
(राजेंद्र पातोडे हे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते आहेत)