मुक्तपीठ टीम
“ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्याच जीवनात उजळावा, अज्ञानाचा तिमिर सुदूर हटावा” या क्रांतीजोती सावित्रीबाई फुलेंच्या जीवन ध्येयानुसार दूरवरच्या आडगावांमध्येही सावित्रीच्या लेकी शिकत आहेत. नव्या ज्ञानज्योती उजळत आहेत. त्यामुळेच खरंतर ३ जानेवारीला औरंगाबादच्या दत्तवाडी या गावात साजऱ्या झालेल्या सावित्री उत्सवाची बातमी उशीरा पोहचूनही चांगली बातमी ठरतेय. सोयगाव तालुक्यातील दत्तवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा उत्सव उत्साहात साजरा झाला. गावात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे ढोल-लेझीमसह प्रभात फेरी काढून दिवसाची सुरुवात झाली. प्रांजल या छोट्या सावित्रीने गावात घरोघरी जाऊन स्त्री साक्षरतेचा जागर घालून स्त्री साक्षरतेचा जोगवा मागितला. सावित्रीबाई फुले यांना तो जोगवा जयंतीनिमित्त अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्त्री शिक्षणाचा जोगवा…
स्त्री शिक्षणाविषयी घोषणा देत विद्यार्थी, शिक्षक गावभर फिरले. त्यांच्या प्रभातफेरीला गावकऱ्यांनीही खूप चांगला प्रतिसाद दिला. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने स्त्री साक्षरतेचा जागर या उपक्रमांतर्गत स्त्री साक्षरतेचा जोगवा मागण्यात आला. गावातील प्रत्येक घरासमोर जाऊन स्त्रियांकडून तो जोगवा मागून घेतला. घरातील प्रत्येक स्त्रीने आपले पूर्ण नाव व झालेले शिक्षण व आपले पद एका चिठ्ठीवर लिहून छोट्याशा सावित्रीच्या झोळीत सावित्रीबाई फुले यांच्या नावाने अर्पण केले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून ही प्रभात फेरी पूर्ण गावात फिरली.
ग्रामीण, डोंगराळ, व दुर्गम भागातही सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी केलेले कार्य किती प्रमाणात पोहोचले. ग्रामीण भागात स्त्री शिक्षणाचे प्रमाण किती याविषयी हे कार्य पडताळून पाहण्यात आले.व त्याविषयी जनजागृती करण्यात आली. त्यामुळे वरील प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामीण भागातील स्त्री शिक्षित झाली असून स्त्री शिक्षणाचे प्रमाण प्रत्येक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात दिसते.
आज खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण घेऊन शिक्षित झाली पाहिजे या उद्देशाने जे शिक्षणाची प्रतिकूल परिस्थितीत बीजे रुजवली ते आज कुठे न कुठे त्याचे वेली वृक्ष वटवृक्ष रूपाने अस्तित्वात दिसून येत आहे. गावातील प्रतिकूल परिस्थिती ज्या मुलींनी आपले उच्चशिक्षण पूर्ण केले आहे, अशा बहिणींच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना मान देऊन त्यांना खऱ्या अर्थाने सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला गावातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. शालेय समितीचे अध्यक्ष समाधान लांडगे तसेच शाळेतील मुख्याध्यापक बापू बाविस्कर व शाळेतील सहशिक्षक गणेश बाविस्कर व शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला.