मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या चोवीस तासात राज्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी राज्यात ४३,२११ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर ३३,३५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तिसऱ्या लाटेत सौम्य लक्षणे असलेली अधिक प्रकरणे समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत रुग्णालयांवरही कमी दबाव आहे. यामुळेच तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना झाला म्हणून लगेच वाट्टेल ती औषधं न घेता सौम्य प्रकारात पॅरासिटोमोलसारखी औषधंही पुरेशी आहेत. तसेच जी औषधे घ्यायची ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे योग्य असेल.
उगाच नको ती अधिक तीव्रेतेची औषधे नकोत!
- तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सर्वप्रथम प्रत्येकाने माध्यमांमधील बातम्या, सल्ल्यांवर न जाता आपली स्थिती तपासणाऱ्या नेहमीच्या किंवा आता सल्ला घेतलेल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावेत.
- प्रत्येक रुग्णांच्या स्थितीनुसार डॉक्टर उपचारांची दिशा ठरवतात. तेच योग्य असते.
- काही डॉक्टरांच्या मते कोरोनाचा सौम्य संसर्ग झाल्यास पॅरासिटामॉलसारखी अँटीव्हायरल औषधेही पुरेशी आहेत.
- तज्ज्ञांकडून मोलनुपिरावीर आणि अजिथ्रोमायसिनच्या मोठ्या प्रमाणात वापराबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
- पॅरासिटामॉल आणि इतर सहाय्यक औषधे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना संसर्गातून बरे होण्यासाठी पुरेसे आहेत.
उच्च जोखमीचे रुग्ण कोणते?
- ज्या रुग्णांना कोरोनाविरूद्ध लसीकरण करण्यात आलेले नाही आणि दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त आहेत, त्यांना उच्च जोखीम असलेले रुग्ण मानले जाऊ शकते. तज्ज्ञांनी सांगितले की अशा रूग्णांची गंभीर लक्षणे वाढल्यास त्यांचे निरीक्षण केले पाहिजे.
- यावर अँटीव्हायरल मोलुपिराविर या औषधाचा खूपच काळजीपूर्वक उपचारासाठी वापर केला जाऊ शकतो.
वैदयकीय तज्ज्ञ काय सांगतात?
- मोलनुपिरावीरची सध्या सौम्य कोरोनाच्या उपचारासाठी शिफारस केलेली नाही.
- ही औषधे गंभीर स्थिती नसलेल्या रुग्णांवर वापरली जाऊ नयेत.
- सौम्य संसर्ग असलेल्या कोरोना रुग्णांवर सौम्य आजारावर उपचार करण्यासाठी हे अद्याप व्यापकपणे सांगितले जात आहे.