मुक्तपीठ टीम
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई आणि भाजपाचे नेते डॉ. अतुल भोसलेंच्या सहकार पॅनेलनं सर्वच्या सर्व जागा जिंकत कारखान्यावर विजय मिळवला आहे. अतुल भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांना या निवडणुकीत पराभव केला आहे.
कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा मतमोजणीचा निकाल जाहीर झाला असून सत्ताधारी जयवंतराव भोसले पॅनेलनं निर्विवाद वर्चस्व राखत २१ पैकी २१ जागा जिंकल्या. दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला होता. गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. निवडणुकीच्या निमित्तानं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही.
जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचा दणदणीत विजय
सातारा सांगली जिल्ह्यात ४७१४५ सभासद असणाऱ्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने दणदणीत विजयी मिळवला.
अतुल भोसलेंची प्रतिक्रिया
कृष्णा सहकारी साखर कारखान्यात राजकारण आणण्याचं अनेकांचं षडयंत्र होतं. मात्र सुज्ञ सभासदांनी तो डाव उधळून लावला असून यापुढील काळात शेतकरी सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर डॉ अतुल भोसले यांनी दिली.