मुक्तपीठ टीम
पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांना जबर मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांना शोधण्यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबादच्या जनसंपर्क कार्यालयात झडती घेणे पोलिसांना महाग पडले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दानवेंच्या तक्रारीवरून दोन पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस शिपायांना निलंबित केले आहे.
स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल झाला नसताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता जनसंपर्क कार्यालयात झडती घेतल्याची तक्रार दानवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याकडे केली. पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबन करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कारण ते हल्लेखोर दानवेंच्या कार्यालयात लपले असल्याची माहिती मिळाल्यामुळेच पोलिसांनी तपासणी केली. त्यामुळे केवळ तांत्रिक बाबी पुढे करून झालेली थेट निलंबनाची कारवाई टोकाची मानली जात आहे.
पत्रकारावर जीवघेणा हल्ला
• जाफराबाद पंचायत समितीसमोर शुक्रवारी स्थानिक पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांना वाळूचोरीच्या घटनांबद्दल बातम्या देतो म्हणून लोखंडी शिगा, लाठ्या-काठ्यांचा वापर करत जबर मारहाण करण्यात आली.
• घटनास्थळी पोहोचलेले पोलीस पाबळे व त्यांना मारहाण करणाऱ्यांना ठाण्यात घेऊन निघाले असता आरोपी कृष्णा शिरसाठ त्याचे साथीदार मोटारसायकलवरून दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात लपले असल्याचे पोलिसांना समजले.
• ११ जूनला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जाफराबाद येथील केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी या कार्यालयाची झडती घेतली.
केंद्रीय मंत्री दानवेंकडून तक्रार, पोलीसच निलंबित!
• दरम्यान ही झडती घेण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याची तक्रार दानवे यांनी पोलीस अधीक्षकांकडे १२ जूनला केली.
• दरम्यान पावळे यांच्या तक्रारीवरून कृष्णा शिरसाट, अमोल सिरसाट, राहुल जाधव, गणेश जाधव, विशाल जाधव, भागवत जाधव, धनराज जाधव व तान्हाजी जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
• या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोटरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल सचिन तिडके, शाबान तडवी यांचा समावेश आहे. पोलिसांनी कार्यालयप्रमुख उद्धव दुनगहू, नागेश धूपे व अंबादास जाधव यांना धक्काबुक्की केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
पत्रकार हल्ल्यामागील मास्टर माइंडच्या चौकशीची मागणी
• मुळात रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात आरोपी गेले होते का? गेले असतील तर ते का गेले होते?
• जिल्हयातील कोणत्या पुढाऱ्याचे वाळू माफियांशी संबंध आहेत? पत्रकारांवरील हल्ल्यामागचे मास्टरमाईंड कोण आहेत?
• संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे.