मुक्तपीठ टीम
देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी वेगाने सुरु आहे. सुरुवातीच्या कलांनुसार मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजांसारखेच ते सध्या तरी दिसत आहेत. गोव्यात काँग्रेसच्या हाताला गोयंकरांची साथ मिळालेली दिसत आहे. तेथे भाजपा सत्ता गमावण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेश, मणिपूरमध्ये भाजपाचा झेंडा फडकताना दिसत आहे. अपवाद उत्तराखंडमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत दिसत होती. मात्र, तिथे भाजपा आता पुढे जाताना दिसत आहे. पंजाबमध्ये आप सध्या काँग्रेसच्या दीडपट जास्त जागांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तिथं यापूर्वीचे सत्ताधारी काँग्रेस आणि प्रबळ मानला जाणारा अकाली दल मागे पडले आहेत. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पक्षासह लढणाऱ्या भाजपाला दुहेरी आकडा तरी गाठता येईल का, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
उत्तर प्रदेश
उत्तरप्रदेशात अपेक्षेप्रमाणेच भाजपा आपल्या सहकारी पक्षांसह वेगाने पुढे निघत आहे.निवडणुकीत जोरदार आव्हान उभे केलेल्या समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादवांना प्रचारात चांगला प्रतिसाद दिसत होता. मात्र ते आणि त्यांचे सहकारी निकालात मात्र सध्या भाजपा युतीच्या फक्त अर्ध्या जागांवर पोहचले आहेत.
काही वेळातच कौलांमध्ये भाजपा उत्तरप्रदेशची सत्ताधारी होऊ शकेल.
गोवा
गोव्यात भाजपाने गेल्या निवडणुकीत जनमताचा कौल विरोधात असूनही विरोधातील आमदार फोडत सत्ता मिळवली होती. मात्र, यावेळी ती सत्ता मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखाली टिकवणं भाजपाला कठिण जाताना दिसत आहे. आता काँग्रेस पुढे आणि त्यानंतर भाजपा आहे. तृणमूल काँग्रेसची चार जागांवरील आघाडी बंगालच्या ममता बॅनर्जींना गोव्यात किंगमेकरची भूमिका देणारी ठरू शकते.
उत्तराखंड
गोव्याप्रमाणेच उत्तराखंडमध्येही भाजपाची सत्ता धोक्यात मानली जात होती. मात्र, सध्या काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत दिसत आहे.
पंजाब
एक्झिट पोलमध्ये दाखवल्याप्रमाणेच पंजाबच्या सत्तेतून काँग्रेसची पंजाबच्या सत्तेतून एक्झिट होताना दिसत आहे. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीची झाडू तिथं प्रस्थापित पक्षांना झाडून टाकताना दिसत आहे. अरविंद केजरीवालांच्या बडेजाव न करणाऱ्या नेतृत्वाला पंजाबी मतदारांनी आपलंसं केल्याचं दिसत आहे. काही वेळातच कौलांमध्ये आप पंजाबची सत्ताधारी होऊ शकेल.