मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नाने ७० हजार कोटींची गुंतवणूक राज्यात येऊ घातली आहे. युवक युवतींसाठी कमी वेळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चांगल काम केलं आहे. युवकांना याचा लाभ होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या पेंग्विन सेनेला विनंती आहे त्यांनी यात कुरापती काढू नये; आडकाठी आणू नये अशी सडकून टीका आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज दादर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
भाजपा नेते आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, अजित पवार आदित्य ठाकरे यांनी राज्यात येणाऱ्या विकास कामांचे स्वागत करायला पाहिजे त्यांना राजकारण करण्यात रस आहे अशी टीका त्यांनी केली. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर बोलताना आ. ॲड. शेलार म्हणाले, त्यांची आधीची व्यक्तव्य संत आणि हिंदू धर्माला संताप आणणारी आहेत. त्यांचे देवदेवतांची टिंगल करणारे व्हीडिओ आले आहेत. त्यांनी पूर्व आयुष्यात केवळ हिंदुत्व आणि हिंदू धर्मावर टीका केली आहे. आता वारकरी संप्रदायावर टीका केली आहे. त्यांना माफी मागावीच लागेल. त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांची सेना हरकत घेणार का? त्यांच्यावर उद्धव ठाकरे कारवाई करणार का? की, त्यांना समर्थन आहे? उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. सुरुवातीला काँग्रेस,राष्ट्रवादी आणि आता सुषमा अंधारे या जवळच्या वाटत आहेत. याबाबत काय भूमिका घेणार स्पष्ट करावे अशी विनंती त्यांनी केली.
साहित्यिकांच्या पुरस्कार वापसीबद्दल आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, जे साहित्यिक पुरस्कार परत करणारे आहेत त्यांनी सांगावं त्यांचं नक्षलवादाला प्रोत्साहन आहे का ? महाविकास आघाडी सरकारच्या काळात शरजिल उस्मानी याला राज्यात फिरवलं त्यावेळी मुख्यमंत्री, गृहमंत्री होते त्यांनी काही कारवाई केली नाही त्यांनी आम्हाला काही शिकवू नये असाही टोला त्यांनी लगावला.
पुस्तकामध्ये नक्षलवादाचे समर्थन करण्यात आले आहे ते सरकारला मान्य नाही, असे स्पष्ट कारण सरकारने दिले आहे आणि ते योग्य आहे. मग जे पुरस्कारावर बोलत आहेत त्यांचे नक्षलवादाचे समर्थन करायचे आहे का? मूळ विषयावर आपली भूमिका स्पष्ट करा असेही त्यांनी सांगितले
लव जिहाद बाबत आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, लव्ह जिहाद संदर्भात समिती नेमली आहे. जे पक्ष मोर्चा काढत आहेत. त्यांनी भूमिका काय हे स्पष्ट करावे. मोर्चा काढायचा तर खड्डे,पाणी तुंबले यावर मोर्चे काढावे असेही ते म्हणाले.