मुक्तपीठ टीम
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या महाग्रंथातून भारताचे अंतरंग उलगडणार आहेत. ‘असा बदलला भारत : पारतंत्र्यातून महासत्तेकडे’ हा दोन खंडाचा, बाराशे पानांचा महाग्रंथ जानेवारी २०२३ मध्ये वाचकांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती प्रकाशक अरविंद पाटकर, महाग्रंथाचे संपादक दत्ता देसाई व मनोविकास प्रकाशनचे संपादक विलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. अरविंद पाटकर, आशिष पाटकर व दत्ता देसाई यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा महाग्रंथ साकारत आहे.
दत्ता देसाई म्हणाले, “भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचा आणि आत्ताचा भारत घडत गेला आहे. घडण्याची ही प्रक्रिया आजही सुरूच आहे. प्रत्येकाला आस्था आणि कुतूहल वाटावे, असा हा प्रवास आहे. या प्रवासातील चढउतार, यासह भारताचा सर्वसमावेशक, सर्वांगीण इतिहास, लेखाजोखा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारा हा ग्रंथ असणार आहे. दोन खंडातील या ग्रंथात आठ विभाग असून, त्यात साठ नामवंत लेखकांनी लिहिले आहे. आधुनिक राष्ट्राची जडणघडण : वाटा आणि वळणे, राजकीय इतिहास : प्रवाह आणि वाटचाल, साहित्य कला : भारतीय दर्शन, लोकशाही : राज्यघटना आणि संरक्षण, धर्म आणि संस्कृती, विज्ञान -शिक्षण-आरोग्य-क्रीडा माध्यमे, उद्योग विकास अर्थकारण पर्यावरण, जात-स्त्री-कामगार-परिजन (आदिवासी /भटके विमुक्त) असे आठ विभाग आहेत.”
“हा शतक-दीड शतकाचा संग्राम नेमका काय होता? त्याचे नायक कोण? विविध प्रवाह, प्रक्रिया व त्यामागील शक्ती, जनतेच्या भूमिका काय होत्या? स्वतंत्र भारत ‘रेडिमेड’ मिळाला की आजही घडतो आहे? गेल्या ७५ वर्षांत स्वातंत्र्याची कमाई काय? आजचा ताणतणाव, वसाहतीकडून महासत्तेकडे जातोय का? पुढील २५ वर्षांत भारत कसा बदलेल? अशा अनेक प्रश्नांची उकल या ग्रंथातून होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, समीक्षक, लेखक, राजकीय विश्लेषक, अभ्यासू पत्रकार यांनी चिंतनशील लेख लिहिले आहेत,” असे दत्ता देसाई यांनी नमूद केले.
अरविंद पाटकर म्हणाले, “महाग्रंथाची निर्मिती, वाचन संस्कृती लोकांपर्यत पोहोचावी याकरीता एक चळवळ म्हणून याकडे पाहत आहोत. संयोगिता ढमढेरे व विलास पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. प्रत्येक जिज्ञासू नागरिकाने, अस्वस्थ देशप्रेमाने, स्वातंत्र्य व लोकशाही प्रेमीने, अध्यापक-अभ्यासकाने, विद्यार्थी-तरुणांनी, कार्यकर्ता-पत्रकाराने हा ग्रंथ वाचावा, असा असणार आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यासह गाव ग्रंथालय, स्वयंसेवी व संशोधन संस्था यांच्यापर्यंत हा ग्रंथ पोहोचवणार आहोत.”