मुक्तपीठ टीम
कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी पिंपरीतील ताथवडेमधील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे. आजवर अनेकदा मुंबईतील बॉलिवूडमध्ये दबक्या आवाजात चर्चेचा विषय ठरलेली काही यूनियन नेत्यांची माफियांसारखी दहशतच साप्तेंच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरल्याचं त्यांच्या अखेरच्या व्हिडीओ संदेशावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता तरी सरकारने चांगल्या कामगार – कर्मचारी संघटनांना संरक्षण देताना दहशत पसरवणाऱ्या यूनियन नेत्यांवर कारवाईची मागणी पुढे आली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर राजकीय गदारोळ उठवणारे सर्वच लढवय्ये राजेश साप्तेंच्या प्रकरणात मात्र गप्प आहेत. त्या यूनियन नेत्यांशी काही राजकीय नेत्यांचे अगदी जवळचे संबंध असल्यामुळे काहींनी गप्प बसणे पसंत केल्याचे बोलले जाते.
प्रतिभाशाली कला दिग्दर्शकाचा असा अंत का?
• कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली
• ही घटना ताथवडे येथे शनिवारी, ३ जून रोजी सकाळी उघडकीस आली.
• साप्ते कुटुंबिय मुंबईत वास्तव्यास आहेत.
• ताथवडे येथेही त्यांचा फ्लॅट आहे.
• राजेश साप्ते हे मुंबई येथून शुक्रवारी एकटेच त्यांच्या ताथवडे येथील घरी आले.
• त्यानंतर आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला.
• त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी.
अखेरचा संदेश देणाऱ्या व्हिडीओनंतर काय घडलं?
• राजेश साप्तेंच्या व्हिडिओबाबत माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
• साप्ते यांच्या पत्नीने पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
• पोलीस त्यांच्या फ्लॅटवर पोहचले तेव्हा राजेश साप्ते यांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आले.
• पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेल्यावर उपचारापूर्वीच राजेश साप्ते यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
• शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
राजेश साप्ते यांच्या ‘त्या’ व्हिडिओतील अंतिम संदेश
“नमस्कार मी राजेश मारुती साप्ते, मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. हा व्हिडीओ बनवताना मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जात आहे. मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीत, सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मौर्या कामगारांना भडकवत आहेत. त्यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत.
माझं पुढचं काम राकेश मौर्या सुरू करू देत नाहीत. माझ्याकडे सध्या पाच प्रोजेक्ट आहेत. पण, राकेश मौर्या कामगारांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला कोणतही काम सुरू करता येत नाहीये. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावा लागला. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे. मला न्याय मिळावा.”
मराठी चित्रपट महामंडळाची कारवाईची मागणी
महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी राकेश मौर्या आणि यूनियनच्या लोकांनी ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांना चित्रपट सृष्टी अडचणीत असताना जो त्रास दिला त्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या कठोर कारवाईसाठी पुणे पोलीस आणि राज्य सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे.