दुर्मिळ कॉईन गुंतवणुकीच्या नावाने अनेकांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच मुंबई सेंट्रल येथून आमीर याकूब शेख नावाच्या एका आरोपीस खार पोलिसांनी अटक केली आहे. आमीरचे बॉस आणि या टोळीचा मुख्य आरोपी इसा अहमद खान हा त्याच्या पत्नीसोबत सोमवारीच विदेशात पळून गेला आहे, त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी आता खार पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बोगस कॉईनसह डाय तसेच विविध बँकेतील एक कोटी अकरा लाख रुपयांची कॅश गोठविली आहे. बुधवारी सायंकाळी एका पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी ही माहिती दिली.
इसा अहमद खान हा ब्रिटीश नागरिक असून त्याने मुंबई आणि बंगलोर शहरात एक कंपनी सुरु केली होती. ही कंपनीत दुर्मिळ नाण्याची खरेदी-विक्री करीत असून त्यातून त्यांनी गुंतवणुकदारांसाठी एक आकर्षक दुप्पट योजना सुरु केली होती. या कॉईनच्या माध्यमातून कंपनीत गुंतवणुक केल्यास गुंतवणुकदारांना काही महिन्यांतच दुपटीने चांगला परतावा मिळेल अशी जाहिरात कंपनीने केली होती. सुरुवातीला काही दिवस गुंतवणुकदारांना पेसे देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला, मात्र नंतर या सर्वांची कंपनीने फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच खार परिसरातील एका व्यावसायिकाने खार पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध तक्रार केली होती, त्यांनी तब्बल ७२ लाख रुपये कंपनीत गुंतविले होते, मात्र दिलेल्या मुदतीत त्यांना परतावा मिळाला नाही, चौकशीनंतर त्यांना कंपनीकडून टोलवाटोलवीचे उत्तरे दिली जात होती, त्यामुळे त्यांनी खार पोलीस ठाण्यात इसासह इतरांविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच खार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन त्रिमुखे, पोलीस अंमलदार भरत काच्चे, सुभाष शिंदे, गणेश सावंत, विजयकुमार डबडे, राहुल पाटील यांनी तपासाला सुरुवात करुन इसाचा खास सहकारी असलेल्या आमीर शेख याला मुंबई सेंट्रल येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले. अटकेनंतर वांद्रे येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस तपासात आमीरने इसा अहमद खान हा त्याच्या पत्नीसोबत सोमवारीच विदेशात पळून गेल्याचे सांगितले. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी कंपनीच्या युबी सीटी, बंगलोर, कर्नाटक येथील कार्यालयात छापा टाकला होता, या कारवाईत पोलिसांनी विविध डिझाईनचे कॉईन बनविण्याचे डाय, कंपनीचे ब्रोशर्स, व्हिजेटिंग कार्ड, विविध देशांचे आणि चित्रांचे ९१७ दुर्मिळ कॉईन हस्तगत केले आहे. तसेच आरोपींच्या विविध सहा बँक खात्यातील १ कोटी ११ लाख ४७ हजार ०९९ रुपये गोठविले आहे. आमीरने चोरबाजारातून कॉईन खरेदी करण्यासाठी आमीरला मदत केली होती, त्यासाठी त्याने स्वतची इलियाना मार्केटिंग नावाची एक कंपनी सुरु केली होती. तपासात आमीरने इसासाठी वेगवेगळ्या डिझायईनचे कॉईन तयार केले होते, त्यात कन्नड अभिनेता राजकुमार यांच्या कॉईनचा समावेश होता. या कॉईन खरेदीसाठी इसाने बंगलोर शहरात एका कार्यक्रमांचे आयोजन केले होते, त्याला गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. गुंतवणुकदारांना कॉईन देताना इसा हा एका प्लास्टिक पिशवीचा वापर करीत होता, ते कॉईन पिशवीतून बाहेर काढू नका, नाहीतर त्याची किंमत कमी होईल असे सांगून त्यांना भीती घालत होता, त्याच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी ते कॉईन पिशवीतून बाहेर काढले नाही, मात्र इसमाकडून फसवणुक झाल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसून आला. आमीरकडून अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आले आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. इसा व त्याची पत्नी विदेशात पळून गेल्याने त्यांच्याविरुद्ध एलओसी जारी करण्यात आले आहे.