मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १२वी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना या निकालावर काही आक्षेप/तक्रारी असतील तर त्या संबंधित विद्यार्थ्यांनी विहित करण्यात आलेल्या नमुन्यात (प्रपत्र -अ)मध्ये अर्ज करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार २५ सप्टेंबर २०२१ अखेर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याबाबत सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी. असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत व अन्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ च्या मूल्यमापनासंदर्भात दाखल याचिका क्र.६२०/२०२१ बाबत सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी २४/०६/२०२१ रोजी निकाल दिला आहे. त्यानुसार परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर झाल्यानंतर या निकालावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्याच्या निराकरणासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याबाबत आदेशित केलेले आहे.