मुक्तपीठ टीम
प्रसिद्ध युवा व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर यांचे सुरेल व्हायोलिन वादन आणि इंदोर घराण्याच्या प्रसिद्ध युवा गायिका अनुजा झोकारकर यांच्या सुमधुर गायनाने रसिकांना स्वरानुभूती घेता आली. ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् तर्फे यज्ञेश व अनुजा यांच्या ‘युवा स्वरानुभूती’ या सांगीतिक मैफलीचे आयोजन केले होते.
कोथरूड येथील वेदभवन मागील ऋत्विक फाउंडेशनच्या सभागृहात यज्ञेश व अनुजा यांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. यज्ञेश यांना रोहित देव (तबला), अमन रायथट्टा (तानपुरा), स्वरदा रामतीर्थकर (स्वरमंडल) यांनी, तर अनुजा यांना अजिंक्य जोशी (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), अमन रायठ्ठा व कस्तुरी कुलकर्णी (तानपुरा) यांनी साथसंगत केली. निवेदन रश्मी वाठारे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक फाउंडेशनच्या ऋतुजा सोमण, सुदिप्तो मर्जीत यांनी केले.
पहिल्या सत्रात यज्ञेश यांनी व्हायोलिनवर मारु बिहाग राग सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली. तीन ताल, धृत एक ताल, मध्यालय धृत, आलाप, जोड आणि विलंबीत एकतालातील बंदीशी सादर करत रसिकांची वाहवा मिळवली. पारंपरिकमध्ये ‘रंगी सारी मेरी चुनरियॉ’ ख्याल अंगाने रसिकांच्या समोर सादर केले. युवा कलाकारांना व श्रोत्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ऋत्विक फाउंडेशनचा हा चांगला उपक्रम असल्याचे यज्ञेश यांनी यावेळी सांगितले.
दुसऱ्या सत्रात अनुजा यांनी ‘राग रागेश्री’ने गायनाची सुरुवात केली. ‘पारिली परकन लागी रे’ ही पारंपरिक बंदिश तीन ताल मध्ये सादर केली. ‘लगन लगी तुम्हारे चरण की’ या पं. रामाश्रय झा यांच्या पारंपरिक तीन तालमधील बंदीशीचे गायन केले. ‘ननदियॉ काहे माहे बोल’ या मिश्र गारा रागातील पारंपारिक ठुमरीने कार्यक्रमाची सांगता झाली. यज्ञेश प्रसिद्ध व्हायोलिन वादक स्वरप्रज्ञ पंडित मिलिंद रायकर यांचे पुत्र व शिष्य आहेत. तर अनुजा इंदोर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी कल्पना झोकारकर यांच्या कन्या व शिष्या आहेत. दोघांनीही यापूर्वी विविध सांगीतिक महोत्सवात सादरीकरण केले आहे.