मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने समाजात – चळवळीत भरीव योगदान देणार्या विविध कार्यकर्त्यांना, मान्यवरांना खालील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. लवकरच एका कार्यक्रमात हे सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जातील.
‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना जाहीर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिला जाणारा ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ ज्येष्ठ लेखक – विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना जाहीर करण्यात येत आहे. सन्मानपत्र व 15 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. लवटे सर पुरोगामी चळवळींचे मार्गदर्शक आहेत, त्यांनी आजवर अनेक पुस्तके लिहिली आहेत, ग्रंथ संपादन केले आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील हिंदी खंड प्रकल्पाचे ते संपादक आहेत. तसेच डॉ. लवटे सरांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची सर्व पुस्तके हिंदीत भाषांतरित करून घेऊन त्यांचे संपादन केले आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या कामामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे विचार-साहित्य देशभर पोचले आहे. याआधी हा आगरकर पुरस्कार डॉ. श्रीराम लागू, विद्या बाळ, निखिल वागळे, डी. डी. बंदिष्टे, प्रभाकर नानावटी, भुरा सिंग यांना देण्यात आला होता.
‘अंनिस’चा जीवनगौरव पुरस्कार – प्रभा पुरोहित (मुंबई)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिला जाणारा ‘जीवनगौरव पुरस्कार’ यावर्षी मुंबई येथील ‘अंनिस’च्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रभा पुरोहित यांना जाहीर करण्यात आला आहे. सन्मानपत्र व 15 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रभा पुरोहित या अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयातून निवृत झाल्यानंतर गेली 20 वर्षे ‘अंनिस’च्या कामात सक्रिय आहेत. त्या अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मांधांची झुंडशाही अशा विविध विषयांवर वर्तमानपत्रात सतत लेखन करत असतात.
सुधाकर आठल्ये ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार
‘सुधाकर आठल्ये ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार’ अंबाजोगाई येथील ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते संतराम दौलतराव कर्हाड आणि लातूर येथील ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव टेंकाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र व प्रत्येकी 10 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संतराम दौलतराव कर्हाड हे बीड जिल्हा ‘अंनिस’मध्ये सक्रिय ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. ते अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयातून सेवानिवृत्त झाले असून ते 1991 पासून ‘अंनिस’मध्ये सक्रिय आहेत. ‘अंनिस’चे लातूर जिल्ह्याचे जेष्ठ कार्यकर्ते असलेले वसंतराव टेंकाळे जिल्हा परिषदे शाळेमधून निवृत्त शिक्षक आहेत, टेंकाळे सरांनी 100 पेक्षा जास्त सत्यशोधकी आणि आंतरजातीय विवाह आयोजित करण्यात भरीव योगदान दिले आहे.
सुधाकर आठल्ये युवा कार्यकर्ता पुरस्कार – उदयकुमार कुर्हाडे (येवला)
सुधाकर आठल्ये युवा कार्यकर्ता पुरस्कार येवला (जि. नाशिक) येथील ‘अंनिस’चे कार्यकर्ते उदयकुमार श्रीराम कुर्हाडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र व 10 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. युवा साथी उदयकुमार कुर्हाडे हे विद्यार्थिदशेत असतानाच ‘अंनिस’च्या कामाशी जोडले गेले. ते विद्यार्थिप्रिय उपक्रमशील शिक्षक असून शासनाच्या शालेय अभ्यासक्रम कमिटीवर ते या तरुण वयात काम करत आहेत.
सावित्रीमाई फुले पुरस्कार- मा. विजया चंद्रकांत श्रीखंडे (नागपूर)
सावित्रीमाई फुले पुरस्कार नागपूर ‘अंनिस’च्या ज्येेष्ठ कार्यकर्त्या विजया चंद्रकांत श्रीखंडे यांना देण्यात येत आहे. सन्मानपत्र व 10 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. श्रीखंडे पती-पत्नी हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या व्याख्यानातून प्रभावित होऊन ‘अंनिस’च्या कामाशी जोडले गेले. ते नागपुरात ‘अंनिवा’चे दरवर्षी 100 वर्गणीदार करतात. विजया श्रीखंडे वयाच्या 60 व्या वर्षी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा’ या विषयावर एम. ए. केले आहे. हा पुरस्कार सावित्रीबाई फुले पतसंस्था माळीनगर, जि. सोलापूर यांच्याकडून पुरस्कृत केला जातो.
भटक्या-विमुक्त जाती-जमाती प्रबोधन पुरस्कार – विनायकराव चव्हाण (इचलकरंजी)
भटक्या-विमुक्त जाती-जमातीतील अघोरी प्रथा, चाली-रीती याविषयी प्रबोधनकार्य करणार्या कार्यकर्त्यांचा प्रबोधन पुरस्कार देऊन अंनिस सन्मान करत असते. यावर्षी हा प्रबोधन पुरस्कार इचलकरंजी येथील ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते विनायकराव चव्हाण यांना देण्यात येत आहे. चव्हाण हे भटक्या जाती-जमातीच्या संघटना बांधणीच्या कार्यात सहभागी होते. डॉ. बाबा आढाव, बाळकृष्ण रेणके, लक्ष्मण माने यांच्यासोबत त्यांनी भटक्या समाजात काम केले आहे. हा पुरस्कार पालघर ‘अंनिस’चे कार्यकर्ते अण्णा कडलास्कर पुरस्कृत करत असतात.