मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. ‘नेताजी सुभाषचंद्र बोस प्रखर राष्ट्रभक्त म्हणून देशाच्या सदैव स्मरणात राहतील. त्यांचा राष्ट्राभिमान, त्याग प्रेरणादायी राहील,’ असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त यापुढे त्यांची जयंती ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरी करण्यात येणार आहे. या पराक्रम दिनाच्याही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, खासदार अरविंद सावंत यांनी देखील पुष्प अर्पण करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/TAUervTasN
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 23, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभिवादन संदेशात म्हणतात, नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे ओतप्रोत राष्ट्रभक्तीचे प्रतिक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा नेताजींवर मोठा प्रभाव होता. सशस्र क्रांतीशिवाय दमनकारी ब्रिटिश राजवटीला हटविता येणार नाही, या उर्मीतून त्यांनी आझाद हिंद सेना उभी केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्फुर्तीस्थानी मानणाऱ्या नेताजींनी स्वातंत्र्य संग्रामाच्या धगधगत्या कुंडात आयुष्य झोकून दिले. युवा पिढीसमोर त्यांनी मातृभूमीचे रक्षण आणि प्रखर राष्ट्रभक्तीचा उत्तुंग आदर्श ठेवला आहे. त्यांचा हा राष्ट्राभिमान आणि त्याग आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या राष्ट्रभक्तीला कोटी कोटी प्रणाम आणि जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत केले अभिवादन
आपल्या मातृभूमीवर अनिवार प्रेम करणारे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन ! #netajisubhaschandrabose pic.twitter.com/4e3olYVHGO
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 23, 2021
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान योद्धे, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून देशवासियांना ‘पराक्रम दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ‘महापराक्रमी’ नेतृत्व आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना व त्यामाध्यमातून अंदमान निकोबारसारखी बेटं स्वतंत्र करुन त्यांनी गाजवलेला महापराक्रम देशाचा गौरवशाली इतिहास आहे. हा इतिहास आपल्याला सदैव प्रेरणा देईल. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधींजींचे नेतृत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
‘आज़ाद हिंद फौज’ को स्थापित कर के ब्रिटिश साम्राज्य के विरुद्ध क्रांति की मशाल जलानेवाले स्वतन्त्रता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस जी को उनकी जयंती दिवस के अवसर पर विनम्र अभिवादन!#NetajiSubhasChandraBose pic.twitter.com/3WTeMtOEcw
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 23, 2021
गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने तर, नेताजींनी सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने देशाचा स्वातंत्र्याचा लढा यशस्वी केला. महात्मा गांधीजींनी ‘देशभक्तांचे देशभक्त’ असा नेताजींचा गौरव केला होता, नेताजींनी गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ संबोधून त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधीजींसारख्या नेत्यांच्या कर्तृत्वातून, कोट्यवधी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून देशाला मिळालेले स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखणे, हीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेताजींचा गौरव करुन देशवासियांना ‘पराक्रम दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.