मुक्तपीठ टीम
पैशाच्या लोभातून भारतातील प्राचिन मूर्ती किंवा अन्य ठेवे चोरून तस्करीमार्गे परदेशात नेण्याच्या अनेक घटना भुतकाळात घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून अशा संपदा चोरीच्या मुद्द्यावर जगभरात वातावरण निर्मिती होत आहे. तसेच भारत सरकारनेही आपले ठेवे परत मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात अनेक प्राचिन मूर्ती आणि इतर ठेवे भारताला परत मिळवण्यात यश आले आहे. त्यात आता भर पडली आहे ती उत्तर भारतातील अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची.
१९१३ मध्ये भारतातून आई अन्नपूर्णा यांची बहुमोल मूर्ती चोरीला गेली. चोरीनंतर ती परदेशात पोहोचली होती. आता १०८ वर्षांनंतर ती कॅनडाहून परतली आहे. या मूर्तीला प्रथम सोरोमध्ये नेण्यात येईल, येथून मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक काशीला पोहोचल्यानंतर प्रतिष्ठापना केली जाईल.
मूर्तीचा इतिहास
- १९१३ मध्ये काशीमधून अन्नपूर्णा मातेची मूर्ती चोरीला गेली होती.
- वेगवेगळ्या माध्यमातून ही मूर्ती कॅनडातील रेजिना विद्यापीठात पोहोचली.
- भारतातून परदेशी तस्करी मार्गाने गेलेल्या अशा मूर्ती किंवा अन्य पुरातन ठेवे पुन्हा भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- त्यानुसार आजवर अनेक मूर्ती किंवा असे पुरातन ठेवे परत आणण्यात आले आहेत.
- कॅनडातील विद्यापीठाकडून परत मिळालेली अन्नपुर्णा मातेची मूर्ती अशा प्रयत्नांमुळेच भारतात परतली आहे.
- कॅनडातून 2 नोव्हेंबर रोजी ही मूर्ती दिल्लीला नेण्यात आली.
- आता या मूर्तीच्या स्थापनेची मिरवणूक तीर्थक्षेत्र सोरोन येथून गुरुवारपासून निघणार आहे.
- त्यानंतर काशीत तिची प्रतिष्ठापना केली जाईल.