मुक्तपीठ टीम
राजधानी दिल्लीत २०११ साली भ्रष्टाचाराविरोधात मोठे आंदोलन उभारणारे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आवाज उठवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आपली नवी संघटना ‘राष्ट्रीय लोक आंदोलन’ या नावाने स्थापन केली आहे.अण्णांनी राष्ट्रीय संघटनेची घोषणा केली असली तरी त्यांचं महाराष्ट्रावरील लक्ष काही कमी होणार नाही. त्यांचं लक्ष्य हे लोकायुक्त कायदा लागू करण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकार हेच असणार आहे.
८४ वर्षीय अण्णा हजारे १९ जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या संघटनेची घोषणा करणार आहेत. अण्णा १९ जून रोजी दिल्लीत येत आहेत. ते येथे त्यांच्या नवीन संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी दिवसभर चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ही संघटना भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणार आहे.
अण्णा हजारेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- १५ मे रोजी अण्णांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले होते.
- त्यात ते म्हणाले होते की, देशातील काही राज्यांनी मार्गदर्शक तत्त्वांनुसार लोकायुक्त कायदे अधिसूचित केले आहेत. परंतु महाराष्ट्रात तसे झाले नाही.
- मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २०१९ मध्ये आंदोलन केले होते, परंतु फडणवीस यांनी मला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यास सरकार तयार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मी माझे आंदोलन मागे घेतले.
- यानंतर विद्यमान आघाडी सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत काहीही केले नाही.
- महाराष्ट्र सरकारने लोकायुक्त कायदा लागू करावा अन्यथा सत्तेवरून हटावे, असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे.