तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
आज पुन्हा एकदा बातम्यांमध्ये अण्णा हजारेंचे नाव ऐकायला. वाचायला मिळाले. आणि ते बोलत नव्हते तेच बरे होते, असे वाटले. माझासारखा एक सामान्य पत्रकार जो अण्णा हजारेंना कधीकाळी सत्ताधाऱ्यांशी झुंजणारा ज्येष्ठ समाजसेवक म्हणून मानत होता. त्या आदराला गेल्या काही वर्षातील त्यांच्या सोयीस्कर मौनानं गेलेली भेग आता तडा जाण्याएवढी रुंदावली आहे. कधी काळी सत्ताधाऱ्यांविरोधात लढणारे अण्णा सिलेक्टिव्ह असते तरी चालले असते, पण त्यांनी ज्या मुद्द्यांवर लढण्यासाठी जनेताला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला ते मात्र सहन होण्यासारखं नाही. मंदिर उघडावीत. खुशाल उघडली जावीत. पण त्याआधी अण्णांनी राळेगणमधील यादवबाबांच्या साक्षीनं खात्री द्यावी, महाराष्ट्रात त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडणार नाही.
केरळंच उदाहरण समोर आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी करून दिलेली आठवण योग्यच आहे. केरळमध्ये ओनम उत्सवामध्ये ३० ते ३५ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली होती. अशाच तथाकथित धर्मप्रेमींच्या दबावाखाली येऊन इतर वेळी धर्माला अफूची गोळी म्हणणाऱ्या डाव्या सरकारने उत्सवात सूट देऊन टाकली. सगळेच शेवटी कितीही आव आणला तरी लोकानुनयी भूमिकेतच जातात. डावेही अशावेळी उजवे वाटू लागतात.
अण्णा, मद्यालयांच्या खुले करण्याबद्दल नक्कीच बोला. पण बेवड्यांच्या त्या गर्दीची मंदिरातील भाविकांच्या गर्दीशी तुलना करू नका. कुठे ते व्यसनी आणि कुठे हे भक्त. परिस्थितीनं गांजलेले, भंपक पुढारी, ढोंगी समाजसेवक यांच्यामुळे हतबल झालेले सामान्य भक्त दिलाशासाठी मंदिरात देवाच्या चरणी जातात. भान हरवून गर्दी करतात. तिथंच अनेकदा अजाणतेपणी घात होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की महसुलाच्या लोभाने आघाडी सरकारने मद्यालयं सुरु केली ते चांगलं केलं. मुळीच नाही. ते चुकलंच. पण आघाडीनं एक चूक केली म्हणून तुम्ही घोडचूकीनं बिघाडी करावी, असं नाही.
अण्णा, मद्यालयांना खुले करण्याबद्दल नक्कीच बोला. नव्हे लढाच. हिंमत दाखवाच. त्या चंद्रपुरातील मायभगिनींनी लढून मिळवलेली दारुबंदी खाणाऱ्या आघाडी सरकारविरोधात आमरण उपोषण करा. ओबीसींचे नेते म्हणवणाऱ्या विजय वडेट्टीवारांनी रद्द झालेल्या आरक्षणापेक्षा दारुबंदी हटवण्यासाठी वजन वापरत मद्यविक्रेत्यांच्या हिताचे रक्षण केले. त्यांना मदयालयात देवासारखं पुजलं गेलं. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करा. अण्णा, आघाडी सरकारविरोधात लढायचंच असेल तर अशा मुद्द्यांवर लढा. माझ्यासारखे तुमच्यावर प्रेम करणारे तेव्हा साथ दिली तशी आताही देतीलच, देतील.
एवढेच नाही अण्णा, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे चार पक्ष महाराष्ट्रात कोरोना संकट असताना गर्दी जमवताना दिसतात. जनतेवर निर्बंध यांच्यावर काहीच बंधनं नाहीत. जुजबी कारवाईला मी महत्व देणार नाही. ते गुन्हे हे उमेदवारी मिळवताना पदकांसारखे मिरवतात. अण्णा, एकाही पक्षाच्या गर्दीविरोधात तुम्ही आजही बोलला नाहीत हो! ज्यांनी ब्रिफिंग दिलं त्यांना ते परवडलं नसतं का?
अण्णा, काँग्रेस सत्ताकाळात तुम्ही जे केलं ते माझ्यासारख्यांना आवश्यक वाटलेलं. तत्कालीन यूपीए-२ची रोजच लक्तरे निघत होती. तुम्ही त्यात आघाडीवर होता. पण अण्णा, रामायण रावणाचा अंत झाल्याशिवाय संपणार कसे? आणि आजच्या रामायणात एखादी व्यक्ती रावण असूच शकत नाही. फार फार तर ते रावणाचं एक डोकं असेल. आजचा रावण ही भ्रष्टाचार, अनाचार ही अपप्रवृत्ती आहे. ती शाश्वत मानली जाऊ लागली आहे. अण्णा, आजही तो तसाच दिसतोय. चेहरे बदलले आहेत. पण सामान्यांचे हाल तेच. आता करप्शनचेही कॉर्पोरायटेझन झाल्याने तो चकचकीत दिसत असेल. पण आहे तो बाधणाराच. लढा अण्णा लढा.
अण्णा, उठा आता उठा. स्वत:चे डोळे आणि डोकेही वापरा. कुठच्यातरी भंपक तामसी डोक्याच्या चिथावणीला बळी पडू नका. वारकरी परंपरा ही संतांची. संयमाची शक्ती सांगणारी. तामसाच्या दुराग्रहाला तिथं थारा नाही. नको त्यांनी कानात काही कुजबुजलेलं डोक्यात भिनवून सामान्यांना चिथावणी देऊ नका. उत्तराखंडमध्ये पारंपरिक कावड यात्रेवर तेथे सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने योग्य बंदी असताना ते इथे आघाडी सत्तेत असलेल्या महाराष्ट्रात वारीवरील योग्य बंधनं उठवण्यासाठी चिथावत होते. केरळात अशांमुळेच पोंगल उत्सवात सूट मिळाली आणि सुट्टीवर गेलेला कोरोना भीतीदायकरीत्या परतला.
सामान्यांना तुमच्यासारख्या लढवय्यांची कायम गरज आहे. पण त्या लढवय्यांनी स्वत:च्या डोक्यानं लढावं. आजही कोटयवधी सोबत येतील. नाहीतर दिल्लीच्या रामलिलावर हजारो आणि घरच्या मुंबईत शेकडोही नाही, असे होते. तसे होऊ नये. तुमच्यासारख्या माणसाचं वलय कायम राहावं ही समाजाचीही गरज आहे. पण जर डोक्याभोवतीचं वलय डोक्यात जाऊन सामान्यांचा घात करणारी चिथावणी सामान्यांनाच देत असाल तर लोक आता ओळखतील. शेंदूर खरवडला गेला तर उरतो तो फक्त दगड. मी हे तुम्हाला सांगावे असे नाही. आपण जाणते आहात. आजवर तुम्ही अनेकांचा शेंदूर खरडवून त्यांचं दगडत्व उघडं पाडलंत. आता तुमच्याकडून तुमच्याच बाबतीत तसं होऊ नये, एवढीच यादवबाबांचरणी प्रार्थना.
ता.क.
अण्णा, कृपया तपासून घ्या. आपलं राळेगण ज्या नगरमध्ये आहे. त्या नगर जिल्ह्यात आपण मंदिरं उघडण्यासाठी चिथावणी दिली तेव्हा ४ हजार ५७५ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत, हे तपासलं का? रोजच नगरमध्ये पाचशेच्यावर नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. राज्यातील कोरोना आजही उफाळलेल्या जिल्ह्यांमधील एक म्हणज तुमचा नगर जिल्हा आहे. तुम्ही काय केलं? असा प्रश्न विचारणार नाही. कारण सर्वच अण्णांनी करावं का, असा प्रतिप्रश्न अंगावर येईल. तुम्ही मुळीच काही करु नका. पण गेल्या २४ तासात नगरमध्ये ७३२ नवे रुग्ण सापडले हे विसरु नका. जा अण्णा यादवबाबांकडे प्रार्थना करा. बारा नगरकरांनी कोरोनामुळे एका दिवसात अखेरचा श्वास घेतला. ते आणि आजवर कोरोनाचे बळी ठरलेल्या साडेसहा हजार नगरकरांसाठी प्रार्थना तरी करा! आणखी एकही बळी नको असे विनवा. तो देव नक्कीच सदबुद्धी देईल!
तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठचे संपादक आहेत.
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite